ओझर विमानतळावर खबरदारी

नाशिक : करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूमुळे पुन्हा एकदा धास्ती वाढली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशासनाने परदेशवारीहून आलेल्या प्रवाशांना महिनाभरात केलेल्या प्रवासाचे घोषणापत्र द्यावे लागणार आहे. ओझर विमानतळावर ही प्रक्रिया पार पाडली जाईल. प्रवासाची माहिती लपविल्याचे उघड झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

याआधी आफ्रिकेतील देशांतून किंवा आफ्रिकामार्गे आलेल्या प्रवाशांची तपासणी करम्ण्याचे महानगरपालिकेने ठरविले आहे. संबंधितांच्या यादीची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. वेगाने फैलाव होणाऱ्या ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर करोना चाचण्या, जनकीय क्रमनिर्धारण चाचण्या, प्रवाशांच्या इतिहासाची नोंद, करोना नियमावलीचे कठोर पालन अशी उपाययोजना लागू करून प्रतिबंधात्मक पावले टाकण्यास सुरूवात झाली आहे.

राज्य शासनाने परदेश आणि देशांतर्गत हवाई प्रवास करुन राज्यात येणाऱ्या प्रवाशांबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ओझर विमानतळ प्राधिकरणला सूचना दिल्या.

परदेश प्रवास करून आलेले प्रवासी देशांतर्गत प्रवासात ही बाब दडवून ठेऊ शकतात. त्यामुळे देशांतर्गत प्रवास करून आलेल्या प्रवाशांना गेल्या महिनाभरात केलेल्या प्रवासाचे स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारक राहणार आहे. त्यात आंतरराष्ट्रीय प्रवासाचा समावेश असल्यास विमानतळावर देशाअंतर्गत प्रवास करुन आलेल्या प्रवाशांना त्यांनी मागील एक महिन्यात केलेल्या प्रवासाचे स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारक असणार आहे. या काळात संबंधिताने आंतरराष्ट्रीय प्रवास केला असेल तर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मालेगाव महापालिका आरोग्य अधिकारी यांना माहिती द्यावी लागणार आहे. त्यासाठी विमानतळावर आवश्यक ती व्यवस्था उभारण्याचे निर्देश मांढरे यांनी दिले. नियमांचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिला आहे.

महापालिकेकडून सज्जता

नव्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपायांवर महानगरपालिकेच्या साप्ताहिक बैठकीत चर्चा झाली. आफ्रिकन देशांसह त्या मार्गाने परदेशातून आलेल्यांची तपासणी करण्यात येणार आहे. नाशिक शहरात परदेशातून किती जण आले, याची यादी विमानतळावर प्राधिकरणाकडून प्राप्त होईल. त्यानंतर तपासणीला सुरुवात होईल, असे मनपाचे वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले. करोनाच्या नियमावलीची प्रभावीपणे अमलबजावणी करण्यावर पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.