संसर्गदर ०.६९ टक्क्यांवर

नाशिक : जिल्ह्यात सोमवारी करोनाचे ४२ नवीन रुग्ण आढळले. त्यामध्ये नाशिक शहरातील २०, ग्रामीण भागातील २५ आणि मालेगाव मनपा क्षेत्रातील एकाचा समावेश आहे. संसर्गदर ०.६९ टक्के इतका आहे. जिल्ह्यात ४६४ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनाच्या नव्या उत्परिवर्तित ‘ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जनजीवन सुरळीत होत असताना वेगाने फैलाव होणाऱ्या या नव्या विषाणूचे संकट घोंघावत आहे. त्यास प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांकडून पुन्हा नियमावलीच्या कठोर अंमलबजावणीसाठी नियोजन केले जात आहे.

करोनाच्या दैनंदिन अहवालानुसार करोनाचे नवीन ४६ रुग्ण आढळले. रविवारी चाचण्यांचे प्रमाण तुलनेत कमी असते. त्यामुळे सोमवारी अहवालात नव्या रुग्णांची संख्या नेहमीच कमी दिसते, असा आजवरचा अनुभव आहे. याच दिवशी ८२ रुग्ण उपचाराअंती बरे झाले. एका रुग्णाचा मृत्यू झाला. करोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये नाशिक शहरात १३३, ग्रामीण भागातील ३११ जणांचा समावेश आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रात पाच तर जिल्ह्याबाहेरील १५ रुग्ण स्थानिक पातळीवर उपचार घेत आहेत.

 ग्रामीण भागात सिन्नरमध्ये सर्वाधिक ९८ सक्रिय रुग्ण आहेत. नगरला लागून असणाऱ्या या तालुक्यात कित्येक महिन्यांपासून करोना नियंत्रणात आलेला नाही. नाशिक तालुक्यात ५१, बागलाण १३, चांदवड १२, देवळा सहा, दिंडोरी १६, इगतपुरी तन, कळवण एक, निफाड ९०, सुरगाणा एक, त्र्यंबकेश्वर दोन व येवल्यात १७ रुग्ण आहेत. नांदगाव व पेठ हे दोन तालुके करोनामुक्त झाले आहे. या ठिकाणी करोनाचा एकही सक्रिय रुग्ण नाही.