नाशिक – विकसित भारताचे स्वप्न पाहताना आजही ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्यसेवा हे मोठे आव्हान आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाची जोड देऊन लोकांपर्यंत पोहोचणारे ‘एसएमबीटी हॉस्पिटल’ हे वैद्यकीय क्षेत्रातील एक आदर्श मॉडेल असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध उद्योजक आणि ‘स्वदेस फाउंडेशन’चे संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी काढले. एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि स्वदेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रूबरू’ या विशेष प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.
याप्रसंगी स्क्रूवाला यांच्या हस्ते एसएमबीटीच्या ‘टेलीहेल्थ’ भ्रमणध्वनी अॅपचे अनावरण करण्यात आले. या उपक्रमामुळे नाशिकमधील अतिदुर्गम पाड्यांवरील रुग्णांना आता घरबसल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणे शक्य होणार आहे. ग्रामीण भागात रस्ते आणि वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने अनेकदा रुग्ण वेळेत रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून ‘टेलीहेल्थ’ सेवा सुरू करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून ६०० हून अधिक ‘स्वदेस मित्र’ आणि एसएमबीटीचे तज्ज्ञ डॉक्टर थेट जोडले जातील. भ्रमणध्वनी नेटवर्क उपलब्ध असलेल्या भागात ‘व्हिडिओ कॉल’ किंवा ‘चॅट’च्या माध्यमातून रुग्ण तपासणी, अहवाल अपलोड करणे आणि औषधोपचार सुचवणे या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
कार्यक्रमात एमबीबीएस प्रशिक्षणार्थी डॉ. अस्मी बोरा आणि डॉ. अंकिता मजुमदार यांनी घेतलेल्या मुलाखतीत स्क्रूवाला यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. ‘केवळ संपत्ती जमा करण्यापेक्षा समाजासाठी दीर्घकालीन मूल्ये निर्माण करणे महत्त्वाचे आहे. अपयश हा प्रवासाचा भाग असून त्यातून शिकून पुढे जावे,’ असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक आव्हानांवर प्रकाश टाकून यावर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील युवकांचा सहभाग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जाणीवजागृतीची नितांत आवश्यकता अधोरेखीत केली. ग्रामीण भारताला स्वावलंबी बनवणे हेच ‘स्वदेस’चे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वदेस फाउंडेशनचे आरोग्यमित्र सध्या ६०० अतिदुर्गम गावांत कार्यरत आहेत. या अॅपमुळे त्यांना एसएमबीटीच्या स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटी डॉक्टरांचे मार्गदर्शन तात्काळ मिळेल. तसेच, या स्वयंसेवकांना प्रथमोपचाराचे विशेष प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगांवकर यांनी दिली. या कार्यक्रमाला एसएमबीटीचे सचिन बोरसे, उपअधिष्ठाता डॉ. धनाजी जाधव, प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. हसमुख जैन यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टर्स, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. ‘स्वदेस उत्सव २०२५’ च्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
