जळगाव : शिवसेना शिंदे गटात खांदेपालटाची चर्चा सुरु असताना जिल्ह्यातील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता काही दिवसांपासून व्यक्त होत आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही हालचाली सुरु असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर, आमदार पाटील यांनीही आपल्याला मंत्रिपद न मागताच मिळेल, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
पाचोरा येथे आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी विविध राजकीय, प्रशासकीय आणि निवडणूकपूर्व तयारी संदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर भाष्य करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मंत्रिपदाबाबत बोलताना त्यांनी आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले की, माझ्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी, ही जशी तुमची इच्छा आहे तशीच माझीही आहे. मात्र, ती केव्हा पडेल हे माझ्या हातात नाही. तरी देखील मंत्रिपद न मागताच मिळेल, असा मला आत्मविश्वास आहे. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी प्रशासनिक घडामोडींवरही भाष्य केले. चाळीसगाव उपजिल्हा कार्यालयास मान्यता मिळाल्याचे सांगताना या कार्यालयाशी पाचोरा आणि भडगाव तालुके जोडले जाऊ नयेत, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवरील प्रशासनिक रचना आणि जनतेच्या सोयीसाठी योग्य निर्णय व्हावेत, यासाठी आपली भूमिका ठाम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
२०२९ मध्ये भडगाव स्वतंत्र मतदारसंघ
शिंदे गटाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी मतदार यादी पुनर्निरीक्षणाच्या कामावर विशेष भर दिला. येत्या आठ तारखेपर्यंत पाचोरा मतदारसंघातील पुनर्निरीक्षणाची संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवायची असल्याने सर्व संबंधित यंत्रणा तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले. अचूक व अद्ययावत मतदार यादी ही निवडणूक प्रक्रियेची पायाभूत बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण घोषणा करताना आमदार पाटील म्हणाले की, आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भडगाव तालुका स्वतंत्र मतदारसंघ म्हणून अस्तित्वात येणार आहे. याचबरोबर नगरदेवळा हे गाव भडगाव मतदारसंघात समाविष्ट केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. भडगावसाठी राजकीय तयारीला लागण्याचे संकेत देखील त्यांनी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांना मेळाव्यात दिले.
शिंदे गटाच्या मेळाव्याला यांची उपस्थिती
शिवसेना शिंदे गटाच्या पाचोऱ्यातील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील होते. याप्रसंगी पक्षाचे उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, शहराच्या नगराध्यक्षा सुनिता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पदमसिंग पाटील, दीपकसिंग राजपूत, अरुण पाटील, नगरपालिकेचे गटनेते सुमित किशोर पाटील, प्रविण ब्राम्हणे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळावा अतिशय उत्साही वातावरणात पार पडला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिल्याने मेळाव्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले.
