नाशिक – ती इतरांप्रमाणेच सर्वसामान्य. असे असतानाही तिने असे काय असामान्य करुन दाखविले की, संपूर्ण गावाला तिचा अभिमान वाटावा. संपूर्ण गावाला तिच्या यशाचा आनंद वाटावा. तिने काहीतरी असे विशेष केले, जे कधी त्या गावात घडलेच नव्हते. त्यामुळे गावाने या लेकीला लाडाने मिरविले. तिच्या स्वागतासाठी आवाजाच्या भिंती (डिजे) उभारल्या. फटाक्यांची आतषबाजी केली. या अनोख्या स्वागतामुळे ती भारावली नसती तरच नवल. असो, तर नेमकी ही कथा काय आहे, ते पाहू या.

“इच्छा तिथे मार्ग” आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळते. हे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने सिद्ध करून दाखवले. पायल भरत महाले हे तिचे नाव. पायल महाले ही मूळची अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील. परंतु, अत्यंत कठीण परिश्रमाच्या जोरावर ‘ओपन’ (खुल्या) प्रवर्गातून पायलची पोलीस भरतीत निवड झाली.

विशेष म्हणजे, वाडीवऱ्हे गावातून पोलीस दलात निवड झालेली पायल पहिलीच मुलगी ठरली असल्याने संपूर्ण इगतपुरी तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. परिस्थितीवर मात करत अनुसूचित जमाती प्रवर्गातील असूनही ‘ओपन’मधून पायलने यश मिळविल्याचे सर्वांना अप्रूप. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत पोलीस दलात मानाचे स्थान पायलने मिळवले आहे. पायलचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण वाडीवऱ्हे या गावातच झाले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही तिने आपल्या ध्येयापासून पाय मागे घेतले नाहीत. सर्व आव्हानांवर मात करत तिने अहोरात्र अभ्यास आणि मैदानी चाचणीचा सराव केला.

पायलला वडिलांची खंबीर साथ

या यशात पायलचे वडील भरत महाले यांचा सिंहाचा वाटा आहे. परिस्थिती बेताची असली तरी त्यांनी मुलीच्या शिक्षणात आणि स्वप्नात कधीही अडथळा येऊ दिला नाही. तिला सतत प्रोत्साहन देत पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे पायलने चीज केले. मुलीने घेतलेले कष्ट आणि गावाने दिलेली साथ यांमुळेच आज हा सुवर्णक्षण पाहायला मिळत आहे. मला तिचा सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया पायलचे वडील भरत महाले यांनी व्यक्त केली.

आवाजाच्या भिंतींच्या तालावर (डिजे) वाडीवऱ्हे गावात जल्लोषात पायलची मिरवणूक काढण्यात आली. जय बजरंग मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात पायलचे स्वागत केले. वाडीवऱ्हे गावाला पहिली महिला पोलीस कर्मचारी मिळाल्याचा आनंद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. या ऐतिहासिक यशाबद्दल बजरंग मित्र मंडळाच्या वतीने गावात पायलची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गावाने एकत्र येत तिचे जंगी स्वागत केले आणि फटाक्यांची आतषबाजी केली. या सोहळ्याला आणि मिरवणुकीला दत्तू शेजवळ, पै. अंबादास कालेकर, ज्ञानेश्वर मालुंजकर, हिरामण कातोरे, शिवाजी भोर, संतोष मते, दत्तू मते, विलास कातोरे, मदन गवळी, भरत मालुंजकर, संतोष बेजेकर, पैलवान करण कालेकर, रामदास सुरुडे, रामचंद्र पाळदे, अविनाश मुर्तडक, वसंत गवते आदींसह वाडीवऱ्हे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तरुण आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पायलच्या या यशामुळे ग्रामीण भागातील इतर मुलींनाही शिक्षण घेण्याची आणि शासकीय सेवेत जाण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.