धुळे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या हजारो महिलांना केवायसीतील तांत्रिक त्रुटींमुळे अडचणींना सामोरे जावे लागले होते. मात्र, आता या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील ५१ हजार ४८४ अर्जांची प्रत्यक्ष पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ऑनलाइन अर्ज प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांकडून केवायसी करताना चुकून चुकीचे पर्याय निवडले गेले. परिणामी अनेक अर्ज ‘पेंडिंग’ किंवा ‘रिजेक्ट’ झाले. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागू नये, तसेच अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये, या उद्देशाने प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

खातरजमा होणार

या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन अर्जातील माहितीची खातरजमा करणार आहेत. पडताळणीदरम्यान उत्पन्नाचा दाखला, वैवाहिक स्थिती, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, रहिवासी पुरावा तसेच बँक खाते सक्रिय आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे महिलांना महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज भासणार नाही.

प्रलंबित हप्त्यांची रक्कम मिळणार

केवायसीतील त्रुटींमुळे अनेक महिलांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते रखडले होते. आता पडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या महिलांचे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असल्याने ग्रामीण भागात निर्माण झालेली चिंता काहीशी दूर झाली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या त्रुटींचे चार गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ६५ वर्षांपेक्षा अधिक वय दाखविणारे पाच हजार ५२४ अर्ज, २१ वर्षांखालील वयाचे दोन हजार ४२२ अर्ज, केवायसीदरम्यान चुकीचा पर्याय निवडलेले ४१ हजार ८२७ अर्ज आणि लिंगाची चुकीची नोंद झालेल्या ७११ अर्जांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांचे हप्ते अडकल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण होते.

चुकीची माहिती भरली

केवायसीदरम्यान विचारण्यात आलेल्या ‘तुम्ही सरकारी नोकरीत आहात का?’ किंवा ‘उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे का?’ अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक महिलांकडून चुकून चुकीचे बटण दाबले गेले होते. प्रत्यक्ष पडताळणीमुळे हा गोंधळ दूर होणार असून कोणावरही अन्याय होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांचे रखडलेले हप्ते मतदानापूर्वी जमा करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते.

या निर्णयामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले असून शासनाच्या या पावलाचे स्वागत केले आहे. पात्र लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकांना आवश्यक सहकार्य करावे, कोणाचेही हप्ते विनाकारण थांबवले जाणार नाहीत, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.