विना परवाना अवैधरित्या खरेदी केलेली सुमारे पावणे तीन लाख रुपयांची किटकनाशके व बुरशीनाशके वाहतुकीदरम्यान पोलिसांनी जप्त केली. कृषी विभागाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील एचएएल कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर दोन लाख ६५ हजार ८४० रुपयांचा हा साठा जप्त करण्यात आला.

हेही वाचा >>> नवरात्रोत्सव : देवीच्या मूर्त्यांच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता

या प्रकरणी निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील प्रणव शेटे याला अटक करण्यात आली आहे. संशयिताने बेकायदेशीरपणे बुरशीनाशके व किटकनाशके खरेदी केली होती. त्याचा साठा करून शेतकऱ्यांना विकण्याचा त्याचा प्रयत्न होता, असे कृषी अधिकारी अभिजित घुमरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी ओझर पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.