विनाहेल्मेट पेट्रोल पंप, शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालयांत प्रवेश बंद

नाशिक : सुरक्षित वाहतुकीसाठी हेल्मेटचा वापर वाढविण्यासाठी शहर पोलिसांनी आता अधिक कठोर पावले उचलली आहेत. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीधारकास पंपावर इंधन दिले जात नाहीच, आता पंप परिसरातही त्यांना प्रवेश मिळणार नाही. तसेच शाळा, महाविद्यालय, वाहनतळ, औद्योगिक  वसाहत, शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांची मुख्यालये या परिसरातही अशा वाहनधारकांना प्रवेश बंदी राहणार आहे.

शहर परिसरातील अपघातात हेल्मेट नसल्याने मागील काही वर्षांत अनेक दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी पेट्रोल पंपचालकांना विश्वासात घेऊन ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम सुरू केली. त्यासाठी प्रत्येक पंपावर पोलीस कर्मचारी

तैनात केले. हेल्मेट परिधान न करणाऱ्यांना पेट्रोल देऊ नये, हा या उपक्रमाचा उद्देश. परंतु काही पंपांवर पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष झाले. तर काही ठिकाणी दुचाकीधारकांनी पंपावरील कर्मचाऱ्यांशी वाद घातले. या मोहिमेने हेल्मेट परिधान करणाऱ्यांचे प्रमाण काही अंशी वाढले. पण आजही अनेक वाहनधारक हेल्मेटविना भ्रमंती करताना दिसतात. मागील काही दिवसांतील घटनाक्रम लक्षात घेऊन पोलीस आयुक्त दीपक पाण्ड्ये यांनी हेल्मेट नाही तर सहकार्य नाही या उपक्रमात अतिरिक्त निर्देश दिले आहेत.  हेल्मेटशिवाय वाहनधारकास पेट्रोल पंप परिसरात प्रवेश मिळणार नाही. प्रत्येक पंपावर पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे फलक लावण्यास सांगण्यात आले आहे. या परिसरात हेल्मेटशिवाय प्रवेश दिल्यास संबंधित पंपाचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे पांडे यांनी सूचित केले. पेट्रोल पंपाप्रमाणेच इतर आस्थापनांचा परिसर, वाहनतळ या ठिकाणी हेल्मेटविना वाहनधारकांच्या प्रवेशास प्रतिबंध राहणार आहे.

सीसीटीव्हीद्वारे पडताळणी

पेट्रोल पंप, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खासगी शिकवणी वर्ग, वाहनळ, शासकीय- निम शासकीय कार्यालये, महापालिका, जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्था, औद्योगिक व लष्करी परिसरात सीसी टीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित आस्थापनेच्या मालमत्ता अधिकाऱ्यावर दुचाकीस्वारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. हेल्मेटशिवाय कुणी प्रवेश केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई केली जाईल. पोलिसांची भरारी पथके उपरोक्त ठिकाणी सीसी टीव्ही चित्रणाची पडताळणी करून कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

वाद घातल्यास प्रतिबंधात्मक कारवाई

हेल्मेटअभावी पेट्रोल देण्यास नकार दिल्यामुळे काही वाहनधारकांनी पंपावर कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. आता पंपासह शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय परिसरात संबंधित आस्थापनेचा मालमत्ता अधिकारी, कर्मचारी यांच्याशी वाद घातल्यास संबंधित वाहनधारकावर फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.