नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला गुरूवारी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरुवात झाली. यात्रेत पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही सहभाग घेतला असताना सर्वांचे लक्ष जनसन्मान यात्रेतील गुलाबी रंगाची वाहने वेधून घेत आहेत. या गुलाबी वाहनांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना आपल्यामुळेच कशी येऊ शकली, हे ठसविण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. दिंडोरीपासून यात्रेचा आरंभ झाला. यावेळी अजित पवार यांच्यासह खासदार सुनील तटकरे, आ. छगन भुजबळ, आ. धनंजय मुंडे आणि अन्य पदाधिकारी सहभागी झाले. यात्रेत शासकीय वाहनांसह अन्य २०० हून अधिक वाहनांचा ताफा आहे. मात्र या ताफ्यात गुलाबी रंगाची वाहने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा गुलाबी रंग वाहनांसाठी वापरण्यात आला आहे. यात्रेत सहभागी होणारे मंत्री, पदाधिकारी यांच्यासाठी दोन-तीन व्हॅनिटी वाहने गुलाबी रंगाचे आहेत. याशिवाय काही छोटी वाहनेही गुलाबी असून या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसह इतर शासकीय योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. ही वाहने सभास्थळी, सार्वजनिक ठिकाणी फिरविण्यात येणार असून या वाहनांमध्ये एलईडी पडद्याचीही सुविधा आहे. त्याव्दारे योजनांची माहिती देण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून अधिवेशनात जाहीर केलेल्या योजनांची जास्तीजास्त प्रसिध्दी होईल, यासाठी प्रयत्न होत आहे.

हे ही वाचा… काळाराम मंदिर दर्शनासह शेतकरी, महिला, उद्योजकांशी चर्चा, आजपासून अजित पवार यांची जनसन्मान यात्रा

अजित पवार यांनी आपल्या पोषाखात केलेला बदल याआधीच चर्चेत आला असून जनसन्मान यात्रेतही त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले आहे.