नाशिक – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील श्री सप्तश्रृंग गडावर सुरू असलेल्या चैत्रोत्सवात गुरुवारी भाविकांची अलोट गर्दी होऊन गडावरील मुख्य प्रवेशद्वार परिसरात चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली. गर्दीत लोखंडी जाळ्या मागे-पुढे केल्या गेल्यामुळे मुले आणि महिलांचे हाल झाले. दुसरीकडे, गडावर कुठेही चेंगराचेंगरी झाली नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाविकांना तलाव आणि नांदुरी येथे काही काळ थांबवून ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. सप्तश्रृंग गडावर चैत्रोत्सव सुरू असून गुरुवारी दर्शनासाठी अलोट गर्दी झाली. सुमारे एक लाख भाविक गडावर आल्यामुळे नियोजन कोलमडले. दर्शनासाठी १० ते १५ हजार भाविक रांगेत होते. पाटील चौकासमोरील मुख्य प्रवेशद्वार परिसरात गर्दीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या ठिकाणी दुतर्फा विक्रेत्यांची दुकाने आहेत. गर्दी नियंत्रणासाठी लोखंडी जाळ्या आणि दोरखंडांचा वापर केला गेला. भाविकांचा ओघ वाढल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाली. कडक उष्मा, गर्दीतून पुढे जाण्याची चढाओढ यामुळे चेंगराचेंगरी होते की काय, असे वाटत होते. या घटनाकमाच्या काही चित्रफिती समाजमाध्यमात प्रसारित झाल्यामुळे यंत्रणेची तारांबळ उडाली.
गडावर भूमिगत गटारी, शेड उभारणी आणि तत्सम विकास कामे प्रगतीपथावर आहेत. यातील काही कामे झाल्यानंतर तेथील जागा एकसमान केली गेली नाही. परिणामी त्याचाही अडसर ठरल्याचे सांगितले जाते. मुळात प्रशासनाने यात्रेपूर्वी संबंधित ठिकाणी समतल करण्याचे सूचित केले होते. गडावर कुठेही चेंगराचेंगरी झाली नसल्याचे प्रशासन आणि देवस्थानचे म्हणणे आहे. गडावर कुठेही चेंगराचेंगरी झालेली नाही, पालखीबरोबर पायी येणाऱ्या भाविकांवर नियंत्रण ठेवणे शक्य नसते. लोखंडी जाळीच्या दोरी निघाल्याने काही काळ गोंधळ झाला. भाविकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. – सुदर्शन दहातोंडे (मुख्य व्यवस्थापक, श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तश्रृंग गड)
चुकीच्या पद्धतीने चित्रफित प्रसारित करण्यात आली. त्यात तथ्य नसून परिस्थिती नियंत्रणात आहे. गुरुवारी मोठ्या संख्येने भाविक गडावर दाखल झाले. यात पायी गडावर येणाऱ्यांची संख्या मोठी होती. वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांच्या मदतीने नांदुरी आणि तलाव या ठिकाणी भाविकांना अर्धा ते पाऊण तास थांबवून ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. टप्प्याटप्प्याने त्यांना गडावर सोडले जात आहे. – रोहिदास वारुळे (तहसीलदार, कळवण)