नाशिक: राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना भ्रमणध्वनीवर शिवीगाळ केल्या प्रकरणी औरंगाबाद येथून पोलिसांनी इंद्रनील कुलकर्णी या संशयिताला ताब्यात घेतले आहे.काही दिवसांपूर्वी येथील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात भुजबळ यांनी केलेल्या विधानावरून विशिष्ट घटकांकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. या घटनाक्रमात एकाने सोमवारी दुपारी भ्रमणध्वनीवरून भुजबळ यांना लघूसंदेश पाठविला होता. तो क्रमांक त्यांनी बंद (ब्लॉक) केला. त्यानंतर काही वेळात संशयिताने व्हॉट्सॲपवर फोन करीत शिवीगाळ केली होती.
याबाबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंबादास खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला असता तो औरंगाबाद येथील असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने औरंगाबाद येथून इंद्रनील कुलकर्णी (४४) याला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली



