इगतपुरीतील सात बंगले गोठविले; इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : इगतपुरी येथील खासगी बंगल्यात अवैधरित्या आयोजित रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या आणि पार्टी आयोजनास सहकार्य करणाऱ्या २९ संशयितांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. काही संशयितांना नऊ दिवस तर काहीना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या पार्टीची बंगला मालकास पूर्वकल्पना होती. तरीही त्याने संशयितांना बंगला उपलब्ध केल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर या प्रकरणात मुंबईस्थित बंगलामालक रणबीर सोनीला आरोपी करण्यात आले आहे. त्याचे सात बंगले गोठविण्यात आले.

रविवारी मध्यरात्री मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाटानजीकच्या बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मद्यधुंद अवस्थेतील २२ संशयितांना ताब्यात घेतले होते. यामध्ये १२ महिला, १२ पुरूषांचा समावेश होता. स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला या दोन बंगल्यात संशयित कोकेनसारखे अंमली पदार्थ, हुक्क्याचे सेवन करताना मद्यधुंद अवस्थेत आढळले होते. पार्टीसाठी अंमली पदार्थ उपलब्ध करणाऱ्या नायजेरियन नागरिकासह पार्टीच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाला गती देण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत २९ जणांना अटक झाली आहे. संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यातील काही संशयितांना नऊ दिवस तर काहींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. युवतींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अंमली पदार्थाच्या पार्टीची बंगलामालक रणबीर सोनीला पूर्वकल्पना होती. त्यामुळे या प्रकरणात त्यालाही आरोपी करण्यात आले. त्याच्या अटकेसाठी पोलीस पथक मुंबईला रवाना करण्यात आले आहे. संबंधिताचे या ठिकाणी सात बंगले आहेत. हे बंगले गाठविण्यात आल्याचे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, संशयितांमध्ये बिग बॉस या कार्यक्र मातील स्पर्धक हिना पांचाल हिच्यासह नृत्यदिग्दर्शिका, दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील काही युवती, एक विदेशी महिला अशा उच्चभ्रु वर्गाचा समावेश आहे. पीयूष शेट्टी या सहकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चरस, गांजासारख्या अंमली पदार्थाचे सेवन करण्यात आले. या प्रकरणात पांचाल हिच्यासह विशाल मेहता, रोहित अरोरा, अकीब, वरूण बाफना, कश्मिा, चांदणी भटीजा, श्रुती शेट्टी, शनया कौर, आषिता, शीना, प्रीती चौधरी, कौशिकी आदींवर कारवाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले.