scorecardresearch

जळगाव : मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची तयारी करणारे ठाकरे गटाचे पदाधिकारी स्थानबद्ध

शहरासह जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले आहेत.

police detained thackeray group activist
ठाकरे गटाचे पदाधिकारी फोटो- लोकसत्ता

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून, पक्षाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेत स्थानबद्ध करण्यात आले आहे.

शहरासह जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते भोकर (ता. जि. जळगाव) येथे दोन तालुक्यांसह दोन राज्यांना जोडणार्‍या भोकर ते खेडीभोकरीदरम्यान तापी नदीवरील पुलाच्या भूमिपूजनासह लोकार्पण, ई-भूमिपूजन होत आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत निवेदन देण्यासाठी गेले. मात्र, पक्षाच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेत स्थानबद्ध करण्यात आले. पक्षाचे सहसंपर्कप्रमुख वाघ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौर्‍यात त्यांना भेटून शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याची तयारी केली होती. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांना पत्र देत भेटीसाठी वेळ मागतिला होता. मात्र, त्यांना वेळ मिळाला नव्हता.

हेही वाचा >>> कपिलधारा तीर्थाचा कुंभमेळा कृती आराखड्यात समावेश करा – जिल्हा प्रशासनाकडे मागणी

दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवेदनासाठी दौरा हे योग्य ठिकाण नसून, त्यांच्याकडे राजकारणाशिवाय काहीच नाही. काम केले नाही तर काम केले नाही म्हणून ओरड करतात. निवेदनासाठी आपण वेळ घेऊ ते  माझ्याबरोबर मुंबईला आले तर मी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळवून देईन. एखाद्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे, असे सांगितले होते. ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून नंतर मुंबई येथे निवेदन द्यावे, असे त्यांनी सुचविले होते. दरम्यान, गुरुवारी  शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख वाघ हे पदाधिकार्‍यांसह दुपारी भोकर येथे दाखल झाले. पोलीस प्रशासनाने त्यांना निवेदन देता येणार नाही असे सांगत त्यांना ताब्यात घेत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले. ताब्यात घेतलेल्यांमध्ये सहसंपर्कप्रमुख वाघ यांच्यासह नंदूभाऊ पाटील, संतोष सोनवणे, जिल्हा उपप्रमुख अ‍ॅड. शरद माळी, विलास पवार, गजूभाऊ महाजन, देवा तायडे यांना जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी हेही कार्यकर्त्यांसह धरणगाव पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे. चौधरी यांच्यासमवेत पक्षाचे शहरप्रमुख भागवत चौधरी, युवासेनेचे सचिव राहुल रोकडे यांच्यासह पदाधिकारी होते. नीलेश चौधरी यांनी ही तर लोकशाहीची हत्या आहे, असे म्हटले आहे. सहसंपर्कप्रमुख वाघ म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्याच्या परवानगीबाबत तहसीलदारांना पत्राद्वारे कळविले होते. मात्र, त्यांनी आम्हाल वेळेबाबत कळविले नाही. शेतकर्‍यांच्या मागण्यांविषयी निवेदन देण्यासाठी वेळ मागितला होता. पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांची मुस्कटदाबी केली आहे. सरकारचा निषेध करावा तितका कमी आहे. शेतकर्‍यांच्या घरात सत्तर ते ब्याऐंशी टक्के कापूस पडून आहे. सध्या कापसाला सात ते साडेसात हजार भाव आहे. कापसाला दहा हजारांचा भाव मिळाला पाहिजे यासह इतर मागण्यांचे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार होतो. मात्र, प्रशासनातर्फे सांगण्यात आले की तेथे जाता येणार नाही. हे सरकार शेतकर्‍यांचे की उद्योगपतींचे आहे, हेच समजत नाही. शेतकर्‍यांचा कोणीच वाली नाही. एकेकाळी शिंगाडे मोर्चे काढणारे आता कुठे गायब झाले, असा प्रश्‍न वाघ यांनी केला.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 16:22 IST
ताज्या बातम्या