जळगाव : बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी महापौर ललित कोल्हे गेल्या महिनाभरापासून नाशिक कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, मुलाच्या लग्नासाठी अंतरिम जामीन मिळण्यासाठी कोल्हे यांनी आता अर्ज केला असला, तरी त्यास सरकार पक्ष आणि पोलिसांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे.
अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांना माजी महापौर कोल्हे यांच्या जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नखाते यांनी २८ सप्टेंबर रोजी एल. के. फार्महाऊसवर छापा टाकला असता, तब्बल ३१ लॅपटॉप तसेच कॉल सेंटर चालविण्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक यंत्रणा आढळून आली.
प्राथमिक तपासणीत हे कॉल सेंटर परदेशी नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आल्याचे उघड झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचे भासवून डेटा तपासण्याच्या किंवा विविध आकर्षक ऑफर देण्याच्या बहाण्याने विदेशी नागरिकांकडून पैसे उकळत होते. पोलिसांच्या तपासात दोन लॅपटॉपवर आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावेही सापडले होते.
ऑनलाईन फसवणुकीच्या उद्देशाने बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून पोलिसांनी माजी महापौर कोल्हे आणि इतर आठ संशयितांच्या विरोधात संघटित गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांर्तगत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, बोगस कॉल सेंटरच्या मागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या कोल्हे नाशिकच्या कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहे.
दरम्यान, मुलाचे काही दिवसांत लग्न असल्याने अंतरिम जामीन देण्याचा अर्ज कोल्हे यांनी न्यायायलाकडे सादर केला आहे. त्यावर सुनावणी झाली असता, कॉल सेंटर चालविण्यासाठी संशयितांचे विदेशात कोणी साथीदार आहेत का, यादृष्टीने आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा आणि गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह अन्य संशयितांचा शोध इंटरपोलच्या मदतीने घेणे बाकी असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी न्यायालयाला सांगितले.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक संचालक तथा गृह विभागाच्या सरकारी अभियोक्ता संगिता ढगे यांनी म्हणणे सादर केले. बोगस कॉल सेंटर प्रकरणाचा गुन्हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे. तसेच संबंधितांवर संघटित गुन्हेगारीची कलम लागू आहेत. मुलाच्या लग्नासाठी अंतरिम जामीन मागणारे माजी महापौर ललित कोल्हे यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून कोल्हेंच्या अंतरिम जामिनाला विरोध करण्यात आला. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर ललित कोल्हे यांनी जळगाव कारागृहात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्याठिकाणी आधीच बंद्यांची मोठी संख्या असल्याने पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत कोल्हे यांची नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. तेव्हापासून कोल्हे नाशिक कारागृहातच आहेत.
