आत्महत्येच्या प्रयत्नापासून परावृत्त केले

नाशिक : घरगुती वादातून थेट आत्महत्येचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असलेल्या चुंचाळे येथील एका तरुणाचे प्राण पोलिसांनी धाव घेऊन वाचविले. या तरुणाने पोलीस नियंत्रण कक्षाला आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. बिनतारी यंत्रणेमार्फत ती माहिती अंबड पोलिसांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेऊन आत्महत्येच्या तयारीत असणाऱ्या व्यक्तीला रोखले आणि समुपदेशनाद्वारे त्याचे मतपरिवर्तन करण्यात आले.

चुंचाळे गावातील एका कुटुंबातील दोन भावांमध्ये मालमत्तेवरून वाद होते. त्यास वैतागून एकाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. याविषयी स्वत: पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने ती माहिती अंबड पोलिसांना कळविली. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी क्षणाचाही विलंब न करता सहकाऱ्यांना चुंचाळे गावाकडे पाठवले. सायरन वाजवत पोलीस पथक काही वेळात चुंचाळेतील दत्तनगर परिसरात पोहोचले.

दरवाजा बंद करून बसलेल्या युवकाला पोलिसांनी आम्ही तुझ्या मदतीसाठी आलो असून आत्महत्या करू नको, असे पटवून दिले. त्यामुळे काही वेळाने युवकाने दार उघडले. पोलिसांनी त्याला बाहेर आणले. घराच्या छताला दोर अडकवून संबंधिताने आत्महत्येची तयारी केल्याचे निदर्शनास आले. युवकास अंबड पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कुटुंबीयांना बोलावून सर्वाची बैठक घेण्यात आली. भाऊ घर देत नसल्याने आपण आत्महत्या करण्याची तयारी केल्याचे तरुणाने सांगितले. कुटुंबीयांचे समुपदेशन करून युवकाचे मतपरिवर्तन करण्यात आले. राग हा क्षणिक असतो आणि त्यातून काहीही घडते. राग शांत झाल्यावर एखादी गोष्ट समजावून, पटवून देता येते. संबंधित युवकाचे पुन्हा एकदा समुपदेशन केले जाणार असल्याचे परोपकारी यांनी सांगितले.

या पथकात हवालदार नितीन राऊत, सुखदेव गिरे, शांताराम शेळके, नितीन राऊत आदींचा समावेश होता.