नाशिकमधील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जुना वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेनेकडून नाशिकमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. मात्र, नेमक्या याचवेळी राजकीय गुन्हे असणाऱ्या सेनेच्या अनेक नेत्यांना पोलिसांकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. यापैकी अनेक नेत्यांना रविवारी रात्री चौकशीसाठी पाचारणही करण्यात आले होते. या सगळ्यामागे भाजपचा हात असून भाजप दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप सेनेने केला आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात भाजप नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या मेळाव्यात शिवसैनिकांनी राडा घातला होता. विजया रहाटकर यांनी मराठवाडा व विदर्भाच्या संदर्भाने केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी बोधलेनगर येथील भाजप महिला आघाडीचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलना वेळी हाती लागलेल्या सेनेच्या महिलांना भाजपच्या महिलांनी झोडपले होते. या प्रकरणी भाजप आमदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे सुधाकर बडगुजर आणि शिवसेना महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह एकूण आठ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याशिवाय, दरम्यानच्या काळात भाजपने पोलिसांवर दबाव आणून दरोडय़ासारखा गंभीर गुन्हा दाखल केल्याचा आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी केला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड तेढ निर्माण झाली होती. मात्र, आता महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर या प्रकरणामुळे सेना नेत्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून राजकीय गुन्ह्यांसाठी चौकशी करण्यात येणाऱ्या नेत्यांमध्ये येत्या निवडणुकीत तिकीट मिळू शकणाऱ्या संभाव्य उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमागे पोलिसी ससेमिरा लावल्याचे आरोप झाले होते.