केबीसी घोटाळा प्रकरण
बहुचर्चित केबीसी घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांच्या बँकेतील तीन लॉकर्स अखेर मंगळवारी उघडण्यात तपास यंत्रणेला यश आले. एका लॉकरची चावी सापडली, तर अन्य दोन लॉकर्स उघडण्यासाठी बँकेकडील चावीचा वापर करावा लागला. या लॉकरमध्ये संशयिताने मोठे घबाड दडविल्याचा अंदाज आहे. या सर्वाची छाननी सुरू असून तपशील बाहेर येण्यास वेळ लागेल, असे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले.
केबीसीच्या भ्रामक साखळी योजनांद्वारे राज्यातील गुंतवणूकदारांची शेकडो कोटींची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. मुख्य संशयित ताब्यात आल्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा तपास यंत्रणेचा प्रयत्न आहे. केबीसीच्या संचालकांची ८० कोटींची स्थावर मालमत्ता व बँक खात्यातील रक्कम आधीच जप्त झाली आहे. भाऊसाहेब व त्याच्या पत्नीच्या तपासात संबंधितांचे बँकेतील तीन नव्या लॉकर्सची माहिती पुढे आली. या लॉकर्समध्ये नेमके काय आहे याची छाननी सोमवारी केली जाणार होती; परंतु ग्राहकाकडे जी चावी असते, ती न सापडल्याने ते उघडण्याची प्रक्रिया रखडली. संशयित भाऊसाहेब व पत्नीकडे असणाऱ्या लॉकरच्या चाव्या न सापडल्याने तपास यंत्रणेने दुसरी चावी बनवून अथवा बँकांकडील चावी उपलब्ध झाल्यास त्यांच्या छाननीचा विचार सुरू केला. या घडामोडीत एका लॉकरची चावी सापडली, तर अन्य दोन बँकांतील लॉकर उघडण्यासाठी बँकेकडील चावीचा वापर करण्यात आला. भाऊसाहेबचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेरी आणि शालिमार येथील शाखेत प्रत्येकी एक, तर रविवार कारंजा येथील नगर अर्बन बँकेत लॉकर आहे. भाऊसाहेब व त्याच्या पत्नीला घेऊन तपास यंत्रणेने लॉकरची झडती घेण्याचे काम सुरू केले. गुंतवणूकदारांना गंडवत संशयिताने लॉकरमध्ये रोकड अथवा सोने-चांदी दडविले असावे असा अंदाज आहे. प्रारंभी त्यात काय आढळले याची माहिती देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली. छाननीचे काम पूर्ण झाल्यानंतर याची माहिती दिली जाईल, असे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
भाऊसाहेबच्या जबाबात अन्य काहींची नावे पुढे येत असल्याने संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यातच भाऊसाहेबच्या कारागृहात असणाऱ्या भावाच्या दोन नव्या लॉकर्सची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे पुढील काळात त्यासाठी संबंधिताची पुन्हा पोलीस कोठडी मागून त्याच्या लॉकरची छाननी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.