नाशिक : भोंग्यांबाबत पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे राजकीय पटलावर पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. ३ मेपर्यंत पोलिसांनी मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर दुप्पट आवाजात तिथे भोंग्याद्वारे हनुमान चालीसा म्हटली जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे. भाजपने भोंग्याचे नियम मंदिर आणि मशिदींसाठी समान असल्याची स्पष्टता करण्याचा आग्रह धरला आहे. शिवसेना आणि काँग्रेसने मनसे भावना भडकावत जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. भोंग्याच्या विषयावरून स्थानिक पातळीवर मनसे-भाजप आणि महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे.

शहरातील मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांनी काढलेल्या आदेशाचे राजकीय पटलावर पडसाद उमटू लागले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा रोख मुख्यत्वे मनसेवर आहे. मनसेला मशिदीसमोर हनुमान चालीसाच्या पठणाचा कोणताही प्रस्थापित अधिकार नाही. केवळ धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने ते हे करीत असल्याचा ठपका ठेवला गेला आहे. या संदर्भात मनसेचे शहराध्यश्र दिलीप दातीर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही केवळ राज ठाकरे यांचा आदेश मानतो, पोलीस आयुक्तांच्या आदेशाशी आम्हाला देणंघेणं नसल्याचे स्पष्ट केले. ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविण्यास मुदत दिली आहे. त्यावर मनसे ठाम असून या मुदतीत भोंगे उतरविले नाही तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजविला जाईल, असे त्यांनी सूचित केले. त्यासाठी परवानगी घेतली जाणार नाही. कारण, आजवर सर्वत्र परवानगीविना सर्रास भोंगे वाजतात. हनुमान चालीसाचे काय वावडे आहे. कायदा सर्वाना समान असायला हवा, याकडे दातीर यांनी लक्ष वेधले. 

पोलीस आयुक्तांच्या आदेशाबाबत तूर्तास भाजपने सावध भूमिका घेतली आहे. या आदेशाची अद्याप स्पष्टता झालेली नाही. आयुक्तांना भेटून माहिती घेतली जाईल. या निर्णयात हिंदु आणि मुस्लीम समाजासाठी समान नियम असल्यास आमची हरकत राहणार नाही. भोंगे लावण्याबाबत केवळ मंदिरांना परवानगी घ्यायची असल्यास अन्याय होईल. नियम सर्वाना सारखेच असले पाहिजे. राजकीय विषय काहीही असला तरी पोलिसांनी आदेशाची स्पष्टता करावी, असा आमचा आग्रह असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी म्हटले आहे.

या निर्णयावरून शिवसेनेनेने मनसेवर निशाणा साधला आहे. मुस्लीम धर्मीयांची शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. मनसे अचानक तो मुद्दा करून सामाजिक भावना भडकावण्याचे काम करीत असल्याचा आरोप सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. जातीय तेढ निर्माण करून काही साध्य होणार नाही. मनसेकडून भाजपच्या सोयीची भूमिका घेतली जात आहे. नियमानुसार परवानगी घेऊन हनुमान चालीसा कुठल्याही मंदिरात म्हणता येईल. मशिदीच्या १०० मीटरच्या क्षेत्रात निर्बंध आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होतील, याकडे बडगुजर यांनी लक्ष वेधले.

 काँग्रेसने पोलीस आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत करीत मनसे आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. कुठल्याही धार्मिक स्थळावर अनधिकृत भोंगे असतील तर ते काढले पाहिजे, असे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी सांगितले. भोंग्यावरून जातीय तेढ निर्माण होणार नाही याची पोलिसांसह नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. भोंग्याबाबत भाजप, मनसेला काही आक्षेप असेल तर देशपातळीवर निर्णय घेण्यासाठी त्यांनी पंतप्रधान, गृहमंत्र्यांना साकडे घालावे. विनाकारण सत्तेसाठी एखाद्या राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आहेर यांनी सुनावले. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी दोन समाजांत जातीय तणाव निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. पारंपरिक पध्दतीने आजवर जे चालत आले आहे, ते चालू द्यावे. राजकीय पक्ष आणि व्यक्तींनी धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी सूचित केले.