आमदार हिरामण खोसकर यांचा इशारा

नाशिक : हरसूल भागात अनेक रस्ते खड्डेमय झाले असून संबंधित विभाग अजूनही सुस्तच आहे. नव्याने होत असलेले रस्ते सुसज्ज आणि चांगले गुणवत्तापूर्ण न झाल्यास संबंधित विभागासह ठेकेदाराला दोषी ठरविण्यात येईल. निकृष्ट दर्जाचे रस्ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आमदार हिरामण खोसकर यांनी दिला आहे.

हरसूल आणि परिसरात विविध ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीला आमदार खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. त्यावेळी खोसकर यांनी हा इशारा दिला.  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, भारती भोये, माजी सभापती सुनंदा भोये, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, उपसरपंच राहुल शार्दूल, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष भारती खिरारी, मिथुन राऊत, नितीन देवरगावकर, विठ्ठल भोये, गोकुळ बत्तासे, वामन खरपडे आदींसह परिसरातील ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.  कोणत्याही भागाच्या विकासासाठी रस्ते सुसज्ज असणे अत्यावश्यक असते. हरसूल परिसर हा आदिवासी असल्याने या भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. हरसूलजवळच त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी गुजरातसह इतर भागातूनही भाविक, पर्यटक येत असतात. हरसूलमार्गे दावलेश्वर, बिल्कस अशा पर्यटन स्थळांकडे जाता येते. परंतु, रस्त्यांची स्थिती चांगली राहत नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती झाल्यास परिसरातील आदिवासींचे उन्हाळय़ात होणारे स्थलांतरही पर्यटकांच्या येण्यामुळे रोखण्यास मदत होऊ शकते, असेही खोसकर म्हणाले.  हरसूल येथे पेठ, तोरंगण, वाघेरा, आंबोली , त्र्यंबकेश्वर, घोटीकडे जाणाऱ्या रस्त्यांची सुधारणा (हरसूल गावातील रस्त्यांचे चौपदरीकरण  करणे) आदी कामांना सुरुवात करण्यात आली.