नाशिक – हिवरे बाजार या गावाचे नाव ३०-३५ वर्षांच्या परिश्रमातून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचले आहे. या गावातील वाद कित्येक वर्षांपासून न्यायालय, पोलिसांपर्यंतदेखील गेलेले नाहीत. कोणत्याही प्रकारच्या वितंडवादास गावाने कधी थारा दिलेला नाही. असे असताना भोंदू अशोक खरातसारख्या प्रवृत्तींना पाठबळ देण्याचे काम आपल्याकडून कसे होईल, असा प्रश्न हिवरे बाजार या गावाला आदर्श स्वरुपात नावारुपाला आणणारे माजी सरपंच आणि आदर्श गाव योजनेचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केला आहे.

सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष अशोक खरातच्या भोंदूगिरीचे आणि महिलांचे लैंगिक शोषण करण्याचे एकेक प्रकरण बाहेर येत आहे. त्याच्याविरुध्द नाशिक पोलिसांकडे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. खरातचे अनेक बडे राजकारणी, उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यासंदर्भातील चित्रफितीही समाज माध्यमात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजारचे माजी सरपंच पदमश्रीप्राप्त पोपटराव पवार यांच्यासंदर्भातील चित्रफित समाज माध्यमात आल्याने ग्रामस्थांनाही धक्का बसला आहे.

या पार्श्वभूमिवर.ग्रामस्थांनी बैठक घेऊन खरातच्या कृत्याचा निषेध करून त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे मत व्यक्त केले. वाईट वृत्तींना पाठबळ देण्याचे काम हिवरे बाजारकडून होणे कदापि शक्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासंदर्भात पोपटराव पवार यांनी लोकसत्ताकडे आपली भूमिका मांडली. खरातच्या कुटुंबियांना पवार यांनी आश्रय दिल्याचे आणि खरातला आर्थिक पाठबळ दिल्याचे म्हटले जात आहे. मुळात, खरातची दुष्कृत्ये उघड होण्याआधीपासून मागील आठवड्यात आपण कृषिविषयक वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मध्य प्रदेश, पुणे येथे होतो. त्यामुळे खरातच्या कुटुंबियांना आश्रय देण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे पवार यांनी नमूद केले.

खरातचे कौतुक करण्यासंदर्भातील चित्रफिती या काही वर्षांपूर्वीच्या आहेत. हिवरे बाजारमध्ये विकास कामे तर भरपूर झाली. परंतु, गाव धार्मिकदृष्ट्या मागे असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे २०१२ मध्ये ग्रामस्थांची बैठक घेऊन जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी भिंगार येथील कारागिरांची भेट घेतली असता.त्यांनी याअगोदर इतर ठिकाणी दगडात बांधलेल्या मंदिरांना भेट देण्याचे ठरले. त्याअंतर्गत राशीन (ता.कर्जत), संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर (नेवासा) तसेच मिरगाव (ता.सिन्नर) येथील ईशान्येश्वर मंदिरांना ग्रामस्थांनी भेट दिली. हिवरे बाजारमध्ये श्री विश्वेश्वर मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम २०१२-१३ मध्ये करण्यात आले. मंदिरांच्या कलशारोहण समारंभासाठी अध्यात्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. त्यात खरातही होते, असे पवार यांनी सांगितले.

अध्यात्म आणि मंदिर एवढ्यापुरताच खरातशी संबंध आला. त्याच्याशी एका व्यासपीठावर कधीच आलेलो नाही. मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिरात चार वर्षांपूर्वी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील मंडळींबरोर हजारो नागरिक उपस्थित होते. अशावेळी उपस्थितांविषयी चांगले बोलणे भाग पडते. त्यावेळी खरातमागे लोंढेच्या लोंढे पळत होते. तोपर्यंत खरातच्या विकृतीची कोणालाच माहिती नव्हती. त्यानंतर नाशिकमध्ये इतर कार्यक्रमाप्रसंगी खरातशी बोलण्याचा संबंध आला. आपण आणि हिवरे बाजारने कधीही, कोणत्याही भोंदूला थारा दिलेला नाही, असे पोपटराव पवार यांनी नमूद केले.