वीज भवनला कुलूप लावून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले

नाशिकरोड येथील विद्युत भवन कार्यालयास टाळे ठोकून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडण्यात आले.

नाशिकरोड येथील वीज भवन कार्यालयास टाळे ठोकण्याच्या आंदोलनात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे व माजी आमदार योगेश घोलप सहभागी झाले.

आंदोलनात खासदार हेमंत गोडसेही सहभागी

नाशिक : ग्रामीण भागातील पथदीप आणि पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ सरपंच परिषद, पंचायत राज विकास मंच यांच्या वतीने मंगळवारी

नाशिकरोड येथील विद्युत भवन कार्यालयास टाळे ठोकून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे या आंदोलनात राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार योगेश घोलपही सहभागी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त  होत आहे. समन्वय साधण्याऐवजी त्यांनी आपल्या सरकार विरोधातील आंदोलन करणाऱ्यांना साथ  देऊन काय साधले? यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा होत आहे.

राज्यातील ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने त्या वीज देयके भरू शकत नाही. यामुळे ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. थकीत देयके न भरल्याने ग्रामस्थांना दिवाबत्ती व पाणीपुरवठा सुविधेपासून वंचित राहावे लागते. याआधी ही देयके जिल्हा परिषद वर्ग करून त्यांच्यामार्फत ‘महावितरण’ला रक्कम दिली जात होती. मात्र त्यात बदल झाला. ग्रामविकास विभागाने कुठलीच कारवाई केलेली नाही. यामुळे वीज कंपनीने ग्रामपंचायतीच्या थकबाकीची रक्कम ग्राम विकास विभागाकडून घ्यावी, अशी मागणी सरपंच परिषदेकडून करण्यात आली.

ग्रामपंचायतींकडे महावितरणची मोठी थकबाकी आहे. ऐन दीपावलीत पथदीप व पाणीपुरवठ्याशी संबंधित वीजपुरवठा खंडित केला. महावितरणने थकबाकी टप्प्याटप्प्याने भरण्याबाबत सांगितले. मात्र ग्रामपंचायतींकडे पैसे नसल्याने ते भरू शकत नसल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

 हा प्रकार समजताच पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी कुलूप काढून आतमध्ये अडकलेल्यांची सुटका केली. या आंदोलनप्रकरणी आंदोलकांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

‘महावितरण’च्या कार्यालयास विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकले. या आंदोलनात खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार योगेश घोलप यांनी सहभागी होऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी आतमध्ये कोंडलेल्या एका अधिकाऱ्याने तुम्ही खासदार आहात, सत्तेत तुमचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. असे असताना आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी त्यांना साथ देणे योग्य आहे का? असा प्रश्न केला. त्यावर खासदार गोडसे यांनी  जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्याला सुनाविले. पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. यातून खासदार गोडसे, घोलप यांची सुटका झाली. तपासात प्रत्येकाची भूमिका पाहून गुन्हा दाखल होईल, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Power building was locked and the officers and employees were locked up akp

Next Story
मोर्चेकऱ्यांच्या रास्ता रोकोमुळे कोंडी
ताज्या बातम्या