नाशिक – राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्यावतीने राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांच्या शहरातील निवासस्थानासमोर शुक्रवारी रात्री तासभर मशाल आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी कृषिमंत्री घरात नव्हते. त्यांनी चर्चेसाठी कडू यांना सिन्नर तालुक्यातील सोमठाणे या आपल्या गावी बोलावून घेतले.

प्रहार संघटनेने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मशाल आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांच्या निवासस्थानावर मशाल मोर्चा काढण्यात आला. कडू हे ट्रॅक्टरमध्ये बसून कृषिमंत्र्यांच्या घरासमोर धडकले. मायको चौक भागात नयनतारा इमारतीत कृषिमंत्री काकाटे हे वास्तव्यास आहेत. या ठिकाणी प्रहारचे पदाधिकारी व शेतकरी जमलेले होते. महायुती सरकारला शेतकऱ्यांची व्यथा आणि त्यांचे दुर्लक्षित हक्क लक्षात आणून देण्यासाठी संघटनेने आमदारांच्या घरी मशाल पेटविण्याची भूमिका जाहीर केली. कर्जमाफी, एक रुपयात पीक विमा योजनेविषयी कृषिमंत्र्यांनी केलेल्या विधानाचा आंदोलकांनी निषेध केला.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत येण्यास लोकप्रतिनिधी व मंत्री जबाबदार आहेत. त्यांच्या कार्यकाळात शेकडो कोटींच्या कर्जवाटपात अनियमितता झाली. त्याची जबाबदारी तत्कालीन संचालक व सध्याचे कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर निश्चित झालेली आहे. निवडणूक काळात महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी कर्जमाफीचे आश्वासने दिले होते. सत्ता मिळाल्यानंतर संबंधितांना त्याचा विसर पडला. विविध कारणांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीची आवश्यकता असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. कडू यांनी आंदोलकांसह तासभर ठिय्या दिला. दरम्यानच्या काळात कोकाटे आणि कडू यांच्यात भ्रमणध्वनीवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. कृषिमंत्र्यांनी कडू यांना सिन्नर तालुक्यातील आपल्या सोमठाणे गावी चर्चेसाठी बोलावले. त्यानंतर कडू हे आंदोलकांसह सिन्नरकडे रवाना झाले.