न्यायालयाच्या आवारात संशयितांना मद्य पुरवण्याचा प्रयत्न करणारे रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्याविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगारांच्या दुहेरी खून प्रकरणातील या संशयितांचे आदरातिथ्य संबंधित नगरसेवकाकडून केले जात होते. महत्त्वाची बाब म्हणजे, याच प्रकरणात पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल आहे. तो तात्पुरता अटकपूर्व जामीन घेत बोहल्यावर चढून अंतर्धान पावला. फरार असलेला भूषण हा याच नगरसेवकाचा मुलगा आहे.
राजाश्रयामुळे शहरात गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचे वारंवार अधोरेखित झाले आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री पीएल ग्रुपच्या कार्यालयात दोन सराईत गुन्हेगारांची हत्या झाली होती. संबंधितांचे मृतदेह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जव्हार फाटा येथे फेकण्यात आले. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयीन सुनावणीसाठी आणले होते. या वेळी नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी संशयितांना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर मद्याच्या बाटल्यांसह अन्य काही वस्तू खुलेआम देण्यास सुरुवात केली. त्यास पोलिसांनी आक्षेप घेतला असता लोंढे यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप त्यांना अटक झाली नसल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.