​नाशिक: शहराचा विस्तार वेगाने होत असताना शहरात दुसरे नाट्यमंदिर व्हायला हवे. महाकवी कालिदास कला मंदिराची अवस्था तशी बरी आहे. नवीन नाट्य मंदिरासाठी पैसे वाचवायचे असतील तर कालिदासचाच आराखडा घ्या आणि यासाठी स्थानिक रंगकर्मींची मदत घ्या, असा सल्ला अभिनेते प्रशांत दामले यांनी महापौर हिमगौरी आडके-आहेर यांना दिला.

​येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराने दामले यांच्यासह सहा मान्यवरांना गौरवण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना दामले यांनी आपल्या खास शैलीत मिश्किल टिप्पणी केली. कालिदास जेव्हा सुरू झाले तेव्हा काय माहोल होता… आता अतिवापरामुळे थोडं इकडे-तिकडे झालं आहे. शर्ट जुना झाला की टाकता येतो, पण नाट्यगृहाचे तसे नाही. नवीन नाट्यगृह बांधाल तेव्हा स्थानिक रंगकर्मींची मदत घ्या. कारण काही नाट्यगृहे ९० फूट उंचीची असतात, तिथे केवळ राजकीय सभा आणि कार्यक्रम होतात. नाशिकमध्ये नवीन नाट्यमंदिर उभं राहावं, अशी मागणी मी महापौरांकडे केली आहे.

नाट्यमंदिर हे कलाकार आणि रसिकांच्या पसंतीचे असायला हवे. नाट्यमंदिर दुरुस्तीसाठी सरकारही प्रयत्न करत आहे, मात्र ही निकड त्यांच्यापर्यंत पोहोचली तर तातडीने निर्णय अपेक्षित आहे. मनोरंजन हा आता जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे एक कलाकार म्हणून ही विनंती करत आहे. नाट्यगृहासाठी मूलभूत गोष्टींचा विचार करा. तसेच रंगकर्मींसाठी नाट्यमंदिर खुले करताना त्यांना दिलेल्या तारखा अचानक काढून घेऊ नका. आमचीही काही आर्थिक गणिते असतात, ती अशा निर्णयामुळे बिघडतात, असे दामले यांनी नमूद केले.

आज कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला, याचा मला विशेष आनंद आहे. पुरस्कार म्हणजे शाबासकीची थाप असते. हा पुरस्कार स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. ‘पद्मश्री’ एवढेच कुसुमाग्रज या नावाला महत्त्व आहे, असेही दामले यांनी सांगितले. खरे तर अभिनेता होईल असे वाटले नव्हते, कारण अभ्यासाचा आणि माझा लांबचा संबंध होता. मला इतर गोष्टींमध्ये जास्त रस होता. शाळेत तब्येत चांगली असल्याने बैठे खेळ जास्त आवडायचे. महाविद्यालयात अभिनयाची आवड निर्माण झाली आणि ती टिकली. जो आवडीचा छंद होता, तेच आता काम झाले आहे. यासाठी मी नोकरी सोडली. खरे तर कलेची सेवा हे अळवावरचे पाणी असते, अनेकदा अवमानही सहन करावा लागतो. या प्रवासात २०२६ पर्यंत इथवर आलो आहे. यामध्ये मला दिग्दर्शकांनी आणि सहकलाकारांनी घडवले. काहीतरी चुकले म्हणूनच समोरचा बोलला, असे मी मानतो.

नाटकासाठी सातत्याने भ्रमंती होत असते, त्यातही बसचा प्रवास असतो. पहिल्याच गिअरमध्ये अपघात होण्याची भीती वाटते, पण रंगदेवतेची कृपा असल्याने आजवर अपघात झाला नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पुरस्कार सोहळ्यास महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्यासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.