नाशिक: इयत्ता अकरावी-बारावीचे शिक्षण घेताना भ्रमणध्वनीचे दुकान चालवून, पुण्यातील पुढील शिक्षणासाठी पैसे जमवणारे आणि वयाच्या २३ व्या वर्षीच सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) झालेले नाशिकचे प्रतिक कर्पे आता मुंबई महानगरपालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक बनले आहेत. देशातील आर्थिकदृष्ट्या सर्वात बलाढ्य महानगरपालिका म्हणून मुंबई महापालिकेची गणना होते. या ठिकाणी प्रतिक कर्पे यांच्यासारख्या आर्थिक क्षेत्रातील जाणकाराला भाजपने काम करण्याची संधी दिली आहे.

​मुंबई महानगरपालिकेत यंदा एकूण १० नामनिर्देशित नगरसेवकांना संधी मिळाली. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांच्या जागा निश्चित होतात. त्यानुसार बहुमतात असणाऱ्या भाजपच्या चार स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाली असून संख्याबळानुसार अन्य पक्षांनाही जागा मिळाल्या आहेत. मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांत इच्छुकांची मोठी चढाओढ होती. थोड्या फार फरकाने पराभूत झालेले किंवा निवडणुकीच्या अखेरच्या क्षणी पक्षांतर करणारे नेतेही या पदासाठी मोर्चेबांधणी करीत होते.

मात्र, भाजपने लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पुढे पक्षाच्या संघटनात्मक व अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या प्रतिक कर्पे यांना ही संधी दिली. स्वीकृत सदस्यांसाठी सरकारने काही पात्रता निश्चित केल्या आहेत. त्यातील एक अट ‘सनदी लेखापाल’ किंवा ‘परिव्यय लेखापाल’ म्हणून पाच वर्षांचा अनुभव असण्याची होती. कर्पे यांच्या नियुक्तीतून तो निकषही पूर्ण केला गेला आहे.

​मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक बनलेले प्रतिक कर्पे हे मूळचे नाशिकचे आहेत. जुने नाशिक भागात त्यांचे घर आहे, तर वडील मधुसूदन कर्पे यांचे रविवार कारंजा भागात किराणा दुकान आहे. किलबिल हायस्कूलमध्ये प्रतिक यांचे शालेय शिक्षण झाले, तर बीवायके महाविद्यालयात त्यांनी अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्याला जायचे होते.

त्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी त्यांनी नाशिकमध्ये असतानाच भ्रमणध्वनीचे दुकान चालवले. पुण्यात पदवीचे शिक्षण घेऊन २०१२ मध्ये ते चार्टर्ड अकाउंटंट झाले आणि त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. ​लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून ते कार्यरत होते. २०२१ पासून मुंबई भाजपचे सचिव, ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, तामिळनाडू प्रभारी, महापालिका निवडणूक भाजप वॉर रूम समन्वयक, महापालिका २०२६ जाहीरनामा समिती आणि भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया सेलचे संयोजक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.

त्यांनी जीएसटी, सीएए आणि कलम ३७० मोहिमेच्या समर्थनार्थ, तसेच प्रधानमंत्री मुद्रा योजना, जनधन योजना, डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या विषयांवर राज्यभरात व्याख्याने दिली आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, कीर्ती महाविद्यालय, युवा सेतू फाउंडेशन आणि अंकुर प्रतिष्ठान यांसारख्या संस्थांसोबत सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित ‘डाव्यांची ढोंगबाजी’ या पुस्तकासाठी त्यांनी संशोधन, लेखन व संकलन केले आहे.