प्रत्येक मंदिराची स्वत:ची काही परंपरा आहे. हजारो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. काळानुरूप काही प्रथा-परंपरा बदलतही आहेत. परंतु, महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या मुद्यावरून गदारोळ करणे योग्य नाही. स्थानिक नागरिक व विश्वस्त मंडळाने असे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. भाजप कायदा करून राम मंदिराची उभारणी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विहिंपच्यावतीने आयोजित ‘आरोग्य दूत’ उपक्रमास तोगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दुपारी सुरूवात झाली. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, राम मंदिर उभारणीसाठी केंद्रात पूर्ण बहुमताच्या सरकारची गरज होती. सध्या भाजप पूर्ण बहुमतात आहे. खुद्द भाजपने काही वर्षांपूर्वी आपल्या घोषणापत्रात राम मंदिरासाठी संसदेत कायदा तयार केला जाईल, असा उल्लेख केला होता. त्याची आठवण देत शक्य तितक्या लवकर राममंदिराची उभारणी झाल्यास हिंदूधर्मीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
महाराष्ट्रातील मंदिरांत महिलांना प्रवेश द्यायचा की नाही ही परंपरेची गोष्ट आहे. हजारो वर्षांची ही परंपरा बदलण्यास काही कालावधी लागणार आहे. असे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन करणे योग्य नाही.
आरोग्य दूत उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात तोगडिया यांनी, सध्या भारतात प्रत्येक १० व्यक्तीमागे एक व्यक्ती कोणत्यातरी आजाराने ग्रस्त असल्याचे सांगत मुले व महिला यांच्या आजाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याकडे लक्ष वेधले.