नाशिक – शासनाच्या आरोग्य विभागाकडून महिला गरोदर राहिल्यानंतर तीन महिन्यांपासून मोफत आवश्यक सोयी सुविधा दिल्या जातात. जिल्हा आरोग्य विभागाने त्यापुढे एक पाऊल टाकत माता मृत्यू, अर्भक मृत्यू रोखण्यासह नवजात बाळांमध्ये आजार व्यंग उद्भवू नये यासाठी गर्भधारणापूर्व आरोग्य सेवा उपक्रम सुरू केला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांच्या सनियंत्रणात नवीन वर्षापासून महिलांसाठी गर्भधारणापूर्व आरोग्य सेवा देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या वतीने गर्भवतींना विविध आरोग्य सेवा दिल्या जातात. त्यात प्रसुतीपूर्व, प्रसुतीवेळी, प्रसुतीपश्चात अर्भकाची घ्यावयाची काळजी, निरोगी अर्भकासाठीची काळजी, कमी वजनाच्या आणि आजारी अर्भकासाठीच्या सेवांचा समावेश आहे. परंतु, माता मृत्यू, अर्भक मृत्यू, अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण, अशा विविध समस्या काही प्रमाणात कायम आहेत. ही स्थिती बदलावी म्हणून नवीन वर्षापासून गर्भधारणापूर्व सेवा देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.
हेही वाचा – “शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे?”, भुजबळांचा सवाल; म्हणाले, “जो व्यक्ती…”
गर्भधारणापूर्व आरोग्य सेवेत वैद्यकीय राहणीमान आणि सामाजिक अशा बाबींची महिलांना गर्भधारणेपूर्वी माहिती दिली जाणार आहे. यात आवश्यकतेनुसार समुपदेशन केले जाणार आहे. याशिवाय नवजात बाळास संसर्गाचे आजार उद्भवू नयेत म्हणून काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे गरोदर मातेचे आरोग्य सुधारून बाळ सुदृढ जन्मेल. त्यामुळे कुठलीही समस्या उद्भवणार नाही.
बाळ आणि मातेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी या नावीन्यपूर्ण उपक्रमास नागरिकांनी चांगल्या प्रकारे साथ द्यावी, मातांनी भविष्यातील गर्भारपण आणि बाळ सुदृढ जन्माला यावे यासाठी वरील योजनेचा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र येथे जाऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहते, प्रभारी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये यांनी केले आहे.
हेही वाचा – जळगाव : सोने, चांदीच्या दराची पुन्हा उच्चांकी वाटचाल, आता ‘इतकी’ आहे किंमत
गर्भधारणापूर्व सेवेचे फायदे
गर्भधारणेपूर्व आरोग्य सेवेमुळे माता मृत्यू, उपजत मृत्यू आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी होईल. अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण, कमी वजनाचे अशक्त बाळ जन्माला येण्याचे प्रमाण कमी होईल. गरोदरपणातील काही गुंतागुंत कमी होईल. बाळामधील व्यंगाचे प्रमाण कमी करता येईल. मातेकडून अर्भकाला होणारे संसर्गजन्य आजार कमी होतील. बाळाला जंतू संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होईल.