अवकाळीने कांदा, द्राक्षाला फटका

डिसेंबरच्या प्रारंभी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात ३८ हजार ९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, ५६ हजार शेतकरी बाधित

नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात ३८ हजार ९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक २३ हजार २४२ हेक्टरवरील कांदा तर, १० हजार ५९९ हेक्टरवरील द्राक्षांचा समावेश आहे. तसेच १२१५ हेक्टरवरील कांदा रोपे, ९६० हेक्टरवरील टोमॅटो आणि ७२८ हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले असून १०९७ गावांतील तब्बल ५६ हजार शेतकरी बाधित झाले.

ऐन हिवाळय़ात डिसेंबरच्या एक आणि दोन तारखेला जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. याआधी पावसाने मोठे नुकसान झाले असताना त्यात नव्याने भर पडली आहे. थंडीतील अवकाळीने प्रतिकूल हवामानाचा थेट परिणाम द्राक्षे, कांदे, भाजीपाला पिकांवर होण्याची धास्ती व्यक्त झाली होती. अनेक भागात सध्या द्राक्षबागा फलधारणा अवस्थेत आहेत. पावसामुळे द्राक्ष घड कुजण्याची धास्ती आहे. सटाणा परिसरात जिथे बागा तयार झाल्या आहेत, तिथे मण्यांना तडे जाण्याची शक्यता वर्तविली गेली.

कृषी विभागाने केलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालातून याची स्पष्टता झाली आहे. प्रतिकूल हवामानाचा कांद्याला मोठा फटका बसला. २३२४२ हेक्टरवरील कांदा  १२१५ हेक्टरवरील कांदा रोपांचे नुकसान झाले. एकटय़ा चांदवड तालुक्यात १८ हजार ५०० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. सिन्नर, दिंडोरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर या तालक्यातील ७२६ हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले. मका, भुईमूग, सोयाबीन, वरई यांचे नुकसान झाले नाही. पण १९ हेक्टरवरील हरभरा, ९६० हेक्टरवरील टोमॅटो, ८३७ हेक्टरवरील भाजीपाला, १५ हेक्टरवरील इतर फळपिके, शेवगा ३२३ तर १११ हेक्टरवरील डाळिंबाचे नुकसान झाले. प्राथमिक अहवाल प्रशासनाने विभागीय कृषी सहसंचालकांकडे सादर केला आहे.

१०९७ गावे बाधित

जिल्ह्यातील १०९७ गावांतील ५५ हजार ८९५ शेतकरी बाधित झाले. यात चांदवड तालुक्यात ११२ गावातील (३०१२२ शेतकरी), मालेगाव  ४२ (४१२५), सटाणा १०९ (४१२५), नांदगाव २२ (४३५०), कळवण १९० (१८७२), देवळा १३ (७३), दिंडोरी ३१७ (४६४७), सुरगाणा (१६५), नाशिक (२७९९), त्र्यंबकेश्वर २५ (३६८), इगतपुरी १८ (४२६), पेठ २५ (१०७), निफाड ८० (१५६२), सिन्नर २० (११००), येवला ११ (५६) यांचा समावेश आहे.

बहुवार्षिक फळपीक क्षेत्रात द्राक्षाचे कोटय़वधींचे नुकसान झाले. सटाणा भागातील द्राक्ष परिपक्व अवस्थेत आहेत. या भागात ९२२ हेक्टरवरील द्राक्षांना फटका बसला. याशिवाय दिंडोरीत १३८४, निफाड १३२५, नाशिक तालुक्यातील ७२६ हेक्टरवरील द्राक्षबागांचे नुकसान झाले. दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, चांदवड तालुक्यात टोमॅटोचे नुकसान झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prematurely farmer rain onion grape ysh

ताज्या बातम्या