अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीतील विस्कळीतपणावर अनेक समित्यांकडून बोट ठेवले जात असून एकूणच नियोजनात आभासी घटक कार्यरत असल्याची भावना बळावत आहे. या पार्श्वभूमीवर, आयोजकांनी सर्व समित्यांची तातडीने बैठक बोलावून संबंधितांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. संमेलनाच्या तयारीत कुठलाही आभासी घटक किंवा समिती कार्यरत नसल्याचा दावा केला जात आहे.

संमेलनाची घटीका समीप आली असताना समित्या आणि आयोजक यांच्यातील बेबनाव उघड होत आहे. आयोजक लोकहितवादी मंडळाने तयारीसाठी एकूण ४० समित्या स्थापन केल्या आहेत. परस्परांशी संबंधित कामांवर आधारीत त्यांची नऊ गटात विभागणी केली. संमेलनाचे स्थळ बदलल्यानंतर भुजबळ नॉलेज सिटीचे समितीनिहाय समन्वयक नियुक्त केले गेले. याशिवाय पालक पदाधिकारी, गट समन्वयक अशी व्यवस्था आहे. इतके सारे असूनही नियोजनातील अनेक बाबींविषयी खुद्द समितींचे प्रमुख अनभिज्ञ असतात. त्यांना साहित्यप्रेमी आणि सदस्यांच्या शंकांचे समाधान करता येत नाही. अनेक विषयांवर कोणाचा कोणात पायपोस नसल्याची स्थिती आहे.

समित्यांनी आगपाखड सुरू  केल्यामुळे आयोजकांनी समिती व गटप्रमुखांना बोलावत त्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यांची मागणी, सूचनांनुसार पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. संमेलनस्थळी सर्व समित्यांची बैठक बोलावली. संबंधितांना अग्निशमन दल, रुग्णवाहिकेची रंगीत तालीम पाहून परतावे लागले. आयोजकांच्या कार्यपध्दतीने काही नाराज पदाधिकारी या प्रक्रियेतून दूर जाण्याच्या  मानसिकतेत आले आहेत. संमेलनाचे भवितव्य प्रत्यक्ष स्थापन केलेल्या समित्यांऐवजी आभासी घटक, समित्यांवर अवलंबून असल्याकडे लक्ष वेधले जात आहे.

नाराजी कशामुळे?

आयोजकांकडून तयारी झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपणास गृहीत धरल्याची भावना काही समित्यांमध्ये बळावली. कार्यक्रम पत्रिका जाहीर झाल्यानंतर असंतोषात भर पडली. तयारीत सक्रिय असणाऱ्यांची नांवे पत्रिकेतून वगळली गेल्याने ते नाराज झाले. समित्यांना आयोजक विश्वासात घेत नाही, सूचना, मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते, अशा तक्रारी वाढत आहेत. आयोजक संस्था किंवा स्वागताध्यक्षांची शिक्षण संस्था यांच्यामार्फत परस्पर संमेलनाची तयारी होत असल्याची साशंकता काही समिती प्रमुख व्यक्त करतात.

साहित्य महामंडळास पूर्वकल्पना

निमंत्रक संस्थेतील एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या कार्यपध्दतीवर याआधी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. संबंधिताला बाजुला ठेवण्याची गरज मांडली होती. परंतु, त्याकडे आयोजकांनी दुर्लक्ष केल्याची झळ आता समित्यांना बसत आहे. पण, आता महामंडळाने मौन बाळगणे पसंत केले आहे.

संमेलनात प्रत्येक समितीने जी कामे सुचविली, त्यानुसार सर्व प्रगतीपथावर आहे. कुठलीही कामे परस्पर केलेली नाहीत. तयारीत आभासी घटक व समित्या कार्यरत नाहीत. उलट भुजबळ नॉलेज सिटीतील मनुष्यबळाची समितींच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत घेतली जात आहे. समिती प्रमुखांचे नियोजनावर नियंत्रण आहे. काही समित्यांच्या मागण्या अखेरच्या टप्प्यातील आहेत. संमेलन काळात त्यांची पूर्तता केली जाईल.

विश्वास ठाकूर (सर्व समित्यांचे मुख्य समन्वयक)