नाशिक – राज्यात शेतकरी दुष्काळामुळे त्रस्त असल्याने केंद्र आणि राज्य सरकार त्यांना सन्मानपूर्वक मदत मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे, पर्यावरण संवर्धन देखील महत्वाचा विषय असून नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

सिंहस्थ कुंभमेळा धर्मध्वजारोहण सोहळ्यानंतर शनिवारी सायंकाळी येथे रामकुंड परिसरात राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीत महागोदाआरती झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासह अनेक मंत्री तसेच विविध आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी मार्गदर्शन केले. ‘नाशिक नगरीला माझा नमस्कार’ अशी त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. नाशिक येथे धर्मध्वजारोहणाचा मान मिळाला याचे समाधान असून त्र्यंबकेश्वर येथे पूजनाचा आनंद मिळाला. कुंभमेळा हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असून प्राचीन ठेवा, जीवन मूल्यांशी जोडणारे माध्यम आहे. या माध्यमातून सामाजिक समरसतेचा संदेश दिला जात आहे. महाराष्ट्र ही अमृतभूमी तर नाशिक ही तपोभूमी असून याठिकाणी साल्हेर दुर्ग, क्रांतिकारकांचे मंदिर असलेले अभिनव भारत आहे. देशप्रेमाचा उगम नाशिक नगरीत झाला असल्याचे राष्ट्रपती मूर्मू यांनी नमूद केले.

कुंभमेळा शाश्वत मूल्यांचा ठेवा- देवेंद्र फडणवीस

कुंभमेळ्या निमित्त नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यानिमित्ताने शहरासाठी ठोस कामे होत आहेत. कुंभमेळा ऐतिहासिक भव्यदिव्य असा असून आपल्या सनातन संस्कृती, शाश्वत मूल्यांचा ठेवा आहे. यामध्ये अनेक वैचारिक प्रवाह मिळतात, त्याचे प्रतिबिंब कुंभमेळ्यात उमटते. गोदावरी आरतीच्या माध्यमातून समरसता संदेश देण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

कुंभमेळ्यामुळे लोकांना काम- एकनाथ शिंदे

कुंभमेळा हा ऐतिहासिक सोहळा आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वज सोहळा पार पडला. पहिल्यांदाच स्त्रीशक्तीला स्थान मिळाले असून.सनातन धर्म नारीशक्तीचा गौरव करण्याचे शिकवतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृध्द सांस्कृतिक दर्शन कुंभमेळ्याच्या माध्यमातून होणार आहे. कुंभमेळा केवळ शहराचा विकास करत नाही तर, लोकांच्या हाताला काम देतो. सरकार हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.