नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त ३१ ऑक्टोबर, शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी नाशिकच्या ऐतिहासिक तपोवनाला भेट देऊन नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाची पाहणी करावी, असे निमंत्रण भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ई-मेलद्वारे देण्यात आले होते. त्यास राष्ट्रपती भवनाकडून ई-मेलद्वारे उत्तर आले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झाल्यापासून तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा सातत्याने गाजला. विकासकामांसाठी शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली. कुंभमेळ्यात साधू-महंतांसाठी तपोवनात साधुग्रामची उभारणी केली जाते. यातील ५४ एकर क्षेत्रावरील १,८२५ झाडे तोडण्याचे प्रस्तावित होते. त्यास पर्यावरणप्रेमींनी कडाडून विरोध केला. हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादात न्यायप्रविष्ट असून, वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात प्रशासनाच्या भूमिकेत काहीसा बदल होऊन वृक्ष न तोडता निवासाची व्यवस्था करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्रपती मुर्मू यांना तपोवन भेटीचे निमंत्रण देऊन तेथील नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाची पाहणी करावी, अशी विनंती केली होती.

गोदावरीच्या काठावरील तपोवन हे नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि नैसर्गिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. वाढते शहरीकरण, हवामान बदल आणि घटत चाललेली हरित क्षेत्रे लक्षात घेता तपोवनासारख्या ऐतिहासिक नैसर्गिक परिसराचे संरक्षण होणे आवश्यक आहे. शहराचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे, ही भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपल्या निमंत्रणातून मांडली होती. या निमंत्रणावर पक्षाचे राज्य सहसचिव राजू देसले, नाशिक जिल्हा सचिव मनोहर पगारे, राज्य कौन्सिल सदस्य प्राजक्ता कापडणे व भीमा पाटील, नाशिक शहर सचिव तल्हा शेख आदींची नावे होती.

राष्ट्रपती भवनाचे उत्तर…

तपोवन भेटीच्या निमंत्रणाला उत्तर देताना राष्ट्रपती भवनाकडून २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये राष्ट्रपती मुर्मू यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान भेटीसाठी वेळ मिळावा, अशी विनंती करणारे निवेदन प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे. या विनंतीचा विचार करण्यात आला. तथापि, वेळेच्या अभावामुळे ही विनंती मान्य करता येत नसल्याचे राष्ट्रपतींच्या खासगी सचिवांनी कळविले आहे.

तपोवनचा विषय राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तपोवन भेट होऊ शकणार नसली, तरी तपोवनाचे संरक्षण, वृक्षतोडीचा प्रश्न आणि नाशिकच्या पर्यावरणीय वारशाचे संवर्धन हे विषय महत्त्वाचेच आहेत. राष्ट्रपतींच्या भेटीच्या निमंत्रणाच्या माध्यमातून हा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे.