नाशिक – सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण परिसर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधित क्षेत्र आणि ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण भागातही असाच निर्णय घेण्यात आला आहे.नाशिक शहराच्या कार्यक्षेत्रात ड्रोन उडविण्यास २९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंध लागू राहणार आहे. या क्षेत्रात ड्रोन उडविणे, ड्रोनद्वारे छायाचित्रण किंवा चित्रीकरण करणे, तसेच ड्रोनचा वापर करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून दोन मिनिटांनी होणार आहे. या सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, १३ आखाड्यांचे प्रमुख महंत यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. नाशिकमध्ये ध्वजारोहण सोहळ्यानंतर सायंकाळी महागोदाआरतीचा कार्यक्रम होणार आहे.
शहरातील रामकुंड, गोदाघाट परिसर तसेच देवमामलेदार मंदिर येथे ड्रोन हल्ल्यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ड्रोनचा वापर करून घडविण्यात आलेल्या विविध हल्ल्यांच्या घटनांचा विचार करता, सार्वजनिक सुरक्षितता राखणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि संभाव्य धोके टाळणे आवश्यक असल्याने हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रतिबंधित परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉट एअर बलून्स, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट तसेच तत्सम हवाई साधनांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय अशा साधनांचे उड्डाण किंवा वापर करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला आहे.
पॅराग्लायडिंगलाही प्रतिबंध
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ड्रोन उड्डाण आणि पॅराग्लायडिंग करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा ‘नो ड्रोन’ आणि ‘पॅराग्लायडिंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी आदेशात नमूद केले आहे.
