जळगाव: वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आगामी काळात मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने हालचाली सुरू असून, प्रस्तावित रिंग रोड आणि जळगाव–जालना रेल्वे मार्गामुळे जळगावसाठी दुसऱ्या रेल्वे स्थानकाची संकल्पना सुद्धा चर्चेत आली आहे.

सध्या जळगाव शहराचा संपूर्ण रेल्वे भार एकाच जंक्शन स्थानकावर आहे. दररोज हजारो प्रवासी, मालगाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा या स्थानकावरून होत असल्याने गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ व कोंडी निर्माण होते. प्रवाशांना तिकीट काउंटर, फलाट आणि पार्किंग व्यवस्थेत अडचणींचा सामना करावा लागतो. शहराची वाढती लोकसंख्या, वाढलेली वाहन संख्या आणि औद्योगिक व व्यापारी हालचालींमध्ये झालेली वाढ लक्षात घेता विद्यमान पायाभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. विशेषतः कृषी व औद्योगिक उत्पादनांच्या माल वाहतुकीमुळे जळगाव जंक्शनवरील ताण आणखी वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रस्तावित जळगाव–जालना रेल्वे मार्ग महत्त्वाचा मानला जात आहे. हा मार्ग मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला थेट जोडणारा दुवा ठरणार असून, या मार्गालगत दुसरे जळगाव रेल्वे स्थानक उभारण्याचा पर्याय पुढे येत आहे.

दरम्यान, प्रस्तावित रिंग रोडमुळे शहराच्या बाह्य भागांना सुलभ जोडणी मिळणार असल्याने, मुख्य शहराबाहेर दुसरे नवीन रेल्वे स्थानक उभारणे अधिक सोयीचे ठरू शकते. दुसरे रेल्वे स्थानक उभारल्यास जळगाव जंक्शनवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच प्रवासी व मालवाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ होईल. शिवाय, नव्या स्थानकाच्या परिसरात औद्योगिक व व्यापारी विकासाला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या ही संकल्पना प्राथमिक चर्चेच्या टप्प्यात असली, तरी शहराच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा ठरत आहे. त्याचा व्यावहारिक विचार करण्याची मागणीही होत आहे. आगामी काळात प्रशासन व रेल्वे विभागाकडून याबाबत ठोस पावले उचलली जातात का, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे. नवीन स्थानक आकारास आल्यास तेथून लांबपल्ल्याच्या गाड्या सोडता येतील. जळगाव विमानतळावर जाणेही सोयीचे ठरेल.

रिंग रोड, जालना मार्गालगत दुसरे स्थानक

जळगाव शहराभोवती प्रस्तावित असलेला रिंग रोड जळगावच्या बाह्य भागांना थेट जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. हा रिंग रोड एकाच वेळी तीन राष्ट्रीय महामार्गांना जोडणी देईल. अवजड वाहनांना शहरात प्रवेश न करता थेट मार्ग उपलब्ध करून देईल. आणि नव्या औद्योगिक वसाहतींसाठी अनुकूल पायाभूत सुविधा निर्माण करेल. याच रिंग रोडच्या अगदी जवळ दुसरे रेल्वे स्थानक उभारल्यास रस्ता आणि रेल्वे यांचा प्रभावी समन्वय साधता येईल. प्रस्तावित जळगाव–जालना रेल्वे मार्ग मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यांना थेट जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन व्यापारी व औद्योगिक वाहतूक सुलभ होईल. महत्वाचे म्हणजे जळगावचे महत्त्व रेल्वे नकाशावर आणखी वाढेल. या रेल्वे मार्गालगत दुसरे रेल्वे स्थानक विकसित झाल्यास ते कॉरिडॉरसाठी प्रमुख प्रवेशद्वार ठरू शकते.

लॉजिस्टिक हब म्हणून नवी ओळख

जळगाव दुसरे रेल्वे स्थानक हे केवळ प्रवासी वाहतुकी पुरते मर्यादित न राहता लॉजिस्टिक आणि माल वाहतूक केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. केळी, कापूस, मका, तसेच औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीसाठी जळगाव आधीच महत्त्वाचे केंद्र आहे. नव्या रेल्वे स्थानकामुळे माल लोडिंग–अनलोडिंग जलद होईल. परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामे आणि कोल्ड स्टोरेज प्रकल्प उभारले जातील. निर्यातक्षम शेती व उद्योगांना चालना मिळेल. जाणकारांच्या मते, नवीन जळगाव रेल्वे स्थानकाच्या जवळपास भविष्यात रेल्वे-कनेक्टेड औद्योगिक क्षेत्र विकसित होऊ शकतो. यात अन्न प्रक्रिया उद्योग, लॉजिस्टिक पार्क, लघु व मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप्ससाठी जागा निर्माण होईल. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पर्यायाने शहराचा आर्थिक पाया मजबूत होईल.