scorecardresearch

सीएनजी दरवाढी विरोधात राष्ट्र्वादी युवक काँग्रेसचे काळे सोने वाटून आंदोलन

सद्यस्थितीत डिझेलच्या किंमतीपेक्षा सीएनजीची किंमत जास्त झाल्यामुळे वाहनधारकांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

सीएनजी दरवाढी विरोधात राष्ट्र्वादी युवक काँग्रेसचे काळे सोने वाटून आंदोलन
सीएनजी दरवाढी विरोधात राष्ट्र्वादी युवक काँग्रेसचे काळे सोने वाटून आंदोलन

नाशिक : सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल–डिझेलला पर्याय म्हणून वाहनधारक नैसर्गिक वायूधारीत वाहनांकडे वळत असताना आता या गॅसची किंमतही झपाट्याने वाढत असल्याने या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सीएनजी पंपांवर ग्राहकांना आपट्याची काळी पाने देऊन उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.दसऱ्याच्या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतिक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. महागाईमुळे नागरिकांच्या सर्वच सणोत्सवावर पाणी फेरले गेले असताना मोदी सरकार विविध माध्यमातून जनतेला महागाईच्या खाईत ढकलत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांचा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांकडे कल आहे.

सद्यस्थितीत डिझेलच्या किंमतीपेक्षा सीएनजीची किंमत जास्त झाल्यामुळे वाहनधारकांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. महामार्ग सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. सर्व वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना त्यात सीएनजी गॅसच्या दरवाढीची भर पडली. नाशिक शहरात सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सीएनजी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. सीएनजी गॅस दरात मोदी सरकारने सतत वाढ केली. नव्या दरवाढीमुळे ९२ रुपये प्रति किलोवरून सीएनजी गॅस ९६ रुपयांवर पोहचल्याने वाहनधारक संतप्त झाले आहेत.

हेही वाचा : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकर वैतागले

नागरिकांवर भार वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री सत्कार स्वीकारण्यात व विविध सणांच्या आनंदोत्सवात व्यस्त असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. वाढती महागाई, अतिवृष्टीने झालेले पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व नागरिकांच्या इतर प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली. यावेळी बाळा निगळ, जय कोतवाल, विशाल डोके, नीलेश भंदुरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या