scorecardresearch

पाणी पेटले… गंगापूर धरणावर मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचे आंदोलन

आंदोलकांनी सुरक्षारक्षकास दमदाटी व धक्काबुक्की करुन धरणाच्या दरवाजा क्षेत्रात प्रवेश केला.

Protest Marathwada activists Gangapur Dam demand rightful water released Jayakwadi dams Nashik Ahmednagar
पाणी पेटले… गंगापूर धरणावर मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचे आंदोलन (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

नाशिक: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आमच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडावे, या मागणीसाठी मराठवाड्यातील काही राजकीय पक्षांच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी अकस्मात गंगापूर धरणावर धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले. धरण परिसरात परवानगीशिवाय प्रवेशास प्रतिबंध आहे. आंदोलकांनी सुरक्षारक्षकास दमदाटी व धक्काबुक्की करुन धरणाच्या दरवाजा क्षेत्रात प्रवेश केला. दरवाजे तोडण्याची धमकी दिल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. आंदोलकांनी धरण परिसरातील कार्यालयासमोर ठाण मांडले.

समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे गंगापूर समुहातून ५०० दशलक्ष घनफूट, दारणा समुहातून २६४३ दशलक्ष घनफूट, मुळा समुहातून २१००, प्रवरा समुहातन ३३६० असे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून एकूण ८६०३ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने त्वरित पाणी सोडण्याचे आदेश दिले असले तरी नाशिक वा नगर जिल्ह्यातील धरणांमधून अद्याप विसर्ग होऊ शकलेला नाही. प्रशासकीय पातळीवर विसर्गाची तयारी करण्यात आली. जायकवाडीचे पथक विसर्ग प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. काही धरणांची संयुक्त पाहणी व नोंदींचे काम अद्याप झालेले नाही.

Guthli Milind Bhagat
वर्धा : अखेर ‘गुठली’ स्थानबद्ध, नागपूरच्या कारागृहात रवानगी
Zendepar Iron Mine
गडचिरोली : झेंडेपार लोहखाणीसंदर्भातील जनसुनावणी रद्द करा; शिष्टमंडळाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना साकडे
buldhana
मराठा आरक्षण: मोताळ्यातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; दोघांना रुग्णालयात हलविले, आंदोलन चिघळले
manoj jarange family participate in maratha grand march
बुलढाण्यातील सकल मराठा समाजाच्या महामोर्च्यात मनोज जरांगेंचे कुटुंबीय सहभागी होणार? आयोजकांचे जोरदार प्रयत्न

हेही वाचा… हातपाय धुण्यासाठी शेळगाव धरणात गेले अन…

जायकवाडीला पाणी सोडण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. महामंडळाच्या आदेशाविरोधात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर पाच डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. अवर्षण काळात पाणी सोडल्यास सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात येतील. वरच्या भागातील धरणांमधून पाणी सोडल्यास ३४ ते ४० टक्के पाण्याचा अपव्यय होणार आहे. हे टाळण्यासाठी जायकवाडीतील मृतसाठ्याचा वापर करण्यास परवानगी देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा… अफवांवर विश्वास ठेवू नका – घोटी, वाडीवऱ्हे पोलिसांचे आवाहन

या घटनाक्रमात स्थानिक धरणांमधून जायकवाडीसाठी विसर्ग झालेला नाही. या पार्श्वभूमीवर, परभणी जिल्ह्यातील आम आदमी पक्षाचे सतीश चकोर आणि ५० कार्यकर्ते दुपारी एक वाजता शहरालगतच्या गंगापूर धरणावर धडकले. नाशिक शहराला याच धरणातून पाणी पुरवठा होतो. या परिसरात परवानगीशिवाय कुणालाही जाता येत नाही. संबंधितांना प्रतिबंध करणाऱ्या सुरक्षारक्षकास त्यांनी धक्काबुक्की केली. जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे तोडण्याची धमकी दिली. हे आंदोलक नंतर दरवाजा परिसरात पोहोचले, असे पाटबंधारेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. सुरक्षारक्षकाने त्यांना कसेबसे दरवाजांपासून सुरक्षित अंतरावर नेले. धरणावरील या विभागाच्या कार्यालयासमोर संबंधितांनी ठिय्या दिला. पोलिसांनी धाव घेऊन अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली. कुठलीही पूर्वकल्पना वा निवेदन न देता हे आंदोलक धरणावर धडकले. सुरक्षा कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याची तक्रार केली जात आहे.

आज निषेध आंदोलन

मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी गंगापूर धरणावर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची तयारी करण्यात आली. परंतु, ऐनवेळी काही कारणास्तव हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले. मंगळवारी सकाळी ११ वाजता उंटवाडी येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Protest by marathwada activists on gangapur dam to demand for rightful water be released to jayakwadi from the dams in nashik and ahmednagar dvr

First published on: 20-11-2023 at 16:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×