पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदी निर्णयास बुधवारी वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीचे औचित्य साधत विरोधकांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसह आम्ही नाशिककर संघटनेने रामकुंडावर नोटाबंदीचे श्राद्ध घातले. केशकर्तन, पिंडदान करत कार्यकर्त्यांंनी भाजपच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. काही सामाजिक संघटनांकडून नोटाबंदीविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.

काळा पैसा व भ्रष्टाचारावर नियंत्रण यावे यासाठी ५०० व १००० रुपयांच्या नोटा अवैध ठरविण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला घेतला होता. यामुळे अवैध धंद्यावर नियंत्रण तसेच दहशतवाद व हेरगिरीवर नियंत्रण येईल असा दावा मोदी यांनी त्यावेळी केला. मात्र या निर्णयामुळे सर्व सामान्यांचे हाल अद्याप सुरू असून या विरोधात बुधवारी शिवसेनेच्या वतीने रामकुंडावर केशकर्तन करत श्राद्धविधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी  ५०० व १०००च्या जुन्या नोटांच्या प्रतिमेला पुष्पहार करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या विषयी बोलताना शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले, सामान्य जनता आजही अच्छे दिन येतील या आशेवर आहे. मात्र तसे चित्र दूरवर दिसत नाही.

नोटाबंदीचा निर्णय फसल्याने आज वर्षश्राद्धाचा कार्यक्रम घेतला. पुढील निवडणुकीत भाजपचे श्राद्ध घालू असा इशारा त्यांनी दिला. यावेळी गटनेता विलास शिंदे, नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी दहशतवाद संपला का, काळा पैसा बाहेर आला का, विकासदर वाढला का आदी प्रश्नांची सरबत्ती करत मोदींजी याचे उत्तर द्या अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नोटबंदीला वर्ष पूर्ण झाल्यामुळे रामकुंड येथे पक्ष कार्यकर्त्यांचा सामूहिक केशकर्तन करण्यात आले.

नोटांचे विधिवत श्राद्ध घालत पंचवटी विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ व अनिल परदेशी यांच्या हस्ते पिंडदानाचा कार्यक्रम झाला. यानंतर काकस्पर्शासाठी पिंडीसमोर चहा ठेवण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश सरचिटणीस नाना महाले, मनपा गटनेते गजानन शेलार आदी उपस्थित होते. नोटाबंदीमध्ये सर्वसामान्यासह सर्वच भरडले गेले. शेतकरी अद्याप उभा राहू शकलेला नाही. दुसरीकडे सरकार रोखीतील काळा पैसा पकडू शकले नाही. बनावट नोटा सापडने सुरू आहे. मग नोटाबंदी कशासाठी असा सवाल ठाकरे यांनी केला. दरम्यान, नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरही नोटाबंदी विरोधात ठिय्या देत काळा दिवस पाळत निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिक शहर जिल्हा व ग्रामीण काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर ५००-१००० रुपयांच्या प्रतिकात्मक नोटा लावत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्या प्रतीकात्मक तिरडीला भडाग्नी देण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष शरद आहेर, शोभा बच्छाव, नगरसेवक शाहू खैरे यांच्यासह जिल्हा व ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते. चलनातून बाद झालेल्या नोटांना तसेच नोटाबंदीच्या काळात या निर्णयामुळे मृत्युमुखी पडलेल्या बँक कर्मचारी, नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान, समविचारी व्यक्ती व संघटनेच्या वतीने सायंकाळी नोटाबंदीविरोधी बी. डी. भालेकर मैदानावर निदर्शने करण्यात आली. यावेळी समविचारी संघटना एकत्र येत मैदानापासून शालीमारमार्गे आंबेडकर पुतळ्याजवळ आली. सरकारच्या नोटा बंदी निर्णयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.