राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीविषयी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चातर्फे बुधवारी भुजबळ यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली.भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ यांचे निवासस्थान गाठत घोषणाबाजी केली. त्यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर सरस्वतीचे पूजन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी अमित घुगे यांनी भुजबळ यांचा आग्रह राष्ट्रीय महापुरूषांच्या प्रतिमा लावण्याचा असला तरी सरस्वतीचे महत्व नाकारता येणार नाही, असे सांगितले. सरस्वतीचे महत्व त्यांना कळावे, यासाठी युवा मोर्चाच्या वतीने लवकरच त्यांना सरस्वती देवीची प्रतिमा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> स्वामीनारायण मंदिर तीर्थयात्रींसाठी अध्यात्मिक आकर्षणाचे केंद्र ; मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे

दरम्यान, सरस्वती देवीविषयी वादग्रस्त विधान करणारे भुजबळ यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी दिनकर पाटील यांनी केली. वादग्रस्त विधान करून भुजबळांनी हिंदुंच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगितले. ज्या महापुरुषांनी समाजात सुधारणा केली, परिवर्तन केले, त्या सर्वांचे पूजन झाले पाहिजे परंतु, १४ विद्या आणि ६४ कलांची अधिष्ठात्री असलेल्या सरस्वती मातेला विरोध का, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. सर्व शाळांमध्ये सरस्वती मातेची पूजा होईल, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांचीही पूजा होईल, असेही पाटील यांनी नमूद केले.