नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळते. यामुळे राष्ट्रवादी किंवा शरद पवार यांच्यावर टीका करण्याची काहींनी सुपारी घेतली आहे. आधी वेगळय़ा मुद्दय़ावर समोरच्यावर टीका करत होते. आता त्यांचे गोडवे गात आहेत. सरडय़ाप्रमाणे रंग बदलणाऱ्यांवर काय बोलायचे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली. यावेळी पवार यांनी राज ठाकरे यांच्या मागील काही विधानांचा संदर्भ देत त्यांची नक्कल केल्याने कार्यकर्त्यांसह सर्वाना हसू अनावर झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी नाशिक दौऱ्यावर असताना पक्ष कार्यालयात त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पवार यांनी राज ठाकरे यांचे कालचे भाषण आधीच्या भाषणाची पुनरावृत्ती होती. मात्र उगाच काही बोलत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे चुकीचे असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीवेळी ते भाजप विरोधात बोलत होते. त्यानंतर आता त्यांचे मतपरिवर्तन, मनपरिवर्तन झाले. आता त्यांनी राष्ट्रवादी आणि सेनेविरोधात बोलायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही. घरात बसून बोलायला काय जाते? गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल होतील. अशा पद्धतीने भाषण करून राज्याचा विकास साधला जाणार आहे का? राज्यात उष्णतेची लाट, भारनियमन, महागाई असे अनेक प्रश्न आहेत. त्यावर न बोलता केवळ इशारा देत रहायचे. यातून जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर पोलीस प्रशासन त्यांचे काम करेल, असा इशारा पवार यांनी दिला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षांतर्गत वाद बाजूला ठेवत आगामी निवडणुकीत पालकमंत्री भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करण्याचे आवाहन केले. महापालिका ज्यांच्या हातात होती, त्यांनी नेमका कसा कारभार केला हे लोकांपर्यंत पोहचवा. सत्तेतून भ्रष्टाचार, भ्रष्टाचारामधून पैसा आणि तोच पैसा वापरून निवडणुका लढविल्या जातील. मात्र आपण विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जावू, असे पवार यांनी सांगितले.