संगमनेर: पुणे-नाशिक सरळ रेल्वे मार्ग व्हावा यासाठी आज, रविवारी संगमनेरमध्ये टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात मोठा जनसागर लोटला होता. पुणे- नाशिक सरळ रेल्वे मार्ग झाल्याशिवाय शांत राहणार नसल्याचा इशारा यावेळी विविध वक्त्यांनी दिला. तर यासाठी नेमलेल्या समितीने ६० दिवसात आपला सुस्पष्ट अहवाल द्यावा. त्यांना कोणतीही मुदतवाढ दिली जाऊ नये, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, या मागणीसाठी आज चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर तसेच समृद्धी महामार्गावरील गोंदे फाटा आणि सिन्नर परिसरात नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले. तरुणांचा मोठा सहभाग हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले. आमदार सत्यजित तांबे यांनी समृद्धी महामार्गावर तर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे, जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरमध्ये हिवरगाव पावसा येथील टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले.

पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्यासह राहुल गांधी समर्थक संघ, छात्र भारती, शिवसेना (ठाकरे गट), रेल्वे कृती समिती, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते आदींसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यापूर्वी केंद्र सरकारने मंजुरी दिलेला मार्ग रद्द करत या मार्गात मोठा बदल करण्यात आला. वास्तविक नाशिक-पुणे ही दोन मोठी शहरे या मार्गाने जोडली जाणार होती. मात्र जवळचे अंतर सोडून हा रेल्वे मार्ग दूरच्या नाशिक-शिर्डी-अहिल्यानगर-पुणे असा मंजूर करण्यात आला. या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. आधीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी संगमनेर तालुक्यातील २६ गावांमधील २८५ हेक्टरचे भूसंपादन करण्यात आले. त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना ६८४.६२ कोटी रुपये वाटण्यात आले. रेल्वेमार्गाच्या कामाने वेग घेतला असतानाच राज्यातील सरकार बदलले आणि जवळचा असलेला सरळ प्रस्तावित रेल्वेमार्ग देखील बदलण्यात आला. परिणामी सिन्नर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, खेड, मंचर, चाकण या शहरांसह परिसरात नाराजी निर्माण झाली.

आमदार तांबे यांनी सुरुवातीचा सरळ रेल्वेमार्गासाठी जनआंदोलनाची हाक दिल्यानंतर आजचे आंदोलन सर्वत्र झाले. संगमनेरमधील टोल नाक्यावर झालेल्या आंदोलनात माजी मंत्री थोरात, माजी आमदार डॉ. तांबे, जयश्री थोरात, रघुवीर खेडकर, अनिकेत घुले यांच्यासह विविध वक्त्यांची भाषणे झाली. या सर्वांनी प्रस्तावित नव्या मार्गाला विरोध दर्शवत जुन्याच सरळ मार्गाने रेल्वे मंजूर करण्याची मागणी केली. या मागणीसाठी मोठा जनलढा उभारण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान आमदार तांबे यांना समृद्धी महामार्गावर आंदोलन करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

समितीने ६० दिवसात निर्णय द्यावा

पुणे-नाशिक सरळ रेल्वे मार्ग व्हावा ही कोणत्याही पक्षाची भूमिका नसून, जनतेच्या अनेक वर्षांच्या मागणीचे जनआंदोलन आहे. मूळ अरेखानानुसारच हा मार्ग झाला पाहिजे. कोणाच्याही दबावाखाली किंवा कोणत्याही कारणाने मार्ग बदलण्याचा प्रयत्न आम्ही स्वीकारणार नाही. तांत्रिक अडचणींचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे, हे स्वागतार्ह आहे. मात्र समितीला मुदतवाढ देऊन विषय पुन्हा लांबणीवर टाकला जाऊ नये. ६० दिवसांत स्पष्ट निर्णय झाला पाहिजे. फक्त तांत्रिक बाबी नव्हे, तर जनभावनेचाही विचार झाला पाहिजे.-आमदार सत्यजित तांबे.