लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात अजूनही शेतकर्यांच्या घरात जुना कापूस पडून आहे. कापूसनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धरणगाव येथे श्रीजी जिनिंगमध्ये श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. नवीन कापसाला सात हजार ५३ रुपये, तर जुन्या कापसाला सात हजार ६०० रुपये भाव मिळाला.




आणखी वाचा-Nashik Onion Auction: नाशिक जिल्ह्यात पुन्हा कांदा लिलाव ठप्प; सणोत्सवात कांदा कोंडी
याप्रसंगी जिनिंगचे संचालक नयन गुजराथी, जीवनसिंह बयस, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, प्रवेश सराफ, प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव डी. जी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, कल्याणेहोळचे सरपंच रमेश पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी, शेतकरी आणि जिनिंग व्यावसायिकांमध्ये समन्वय असल्यास यातून प्रगतीची मोठी संधी असल्याचे सांगितले. दरम्यान, महावीर कॉटनमध्ये नवीन कापसाला सात हजार १११ रुपये तर, कृष्णा कॉटनमध्ये सात हजार ३१ रुपये भाव देण्यात आला.