लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: महानगरपालिकेने होळकर पूल ते आनंदवल्ली दरम्यान गोदापात्र स्वच्छता मोहीम हाती घेतली असून त्या अंतर्गत दररोज सुमारे आठ ते १० टन पाणवेली हटविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अनेक महिन्यांपासून पाणवेलीच्या जोखडात अडकलेली गोदावरी पुन्हा एकदा मोकळा श्वास घेत आहे. तथापि, दुषित पाण्यावर फोफावणाऱ्या पाणवेलींना कायमस्वरुपी अटकाव घालण्यास मात्र अद्याप यश आलेले नाही.
शहरातील गोदा पात्रात अनेक महिन्यांपासून पाणवेलीचे साम्राज्य पसरलेले होते. त्यामुळे काही ठिकाणी ही नदी आहे की मैदान असा प्रश्न अनेकांना पडायचा. पाणवेलींची निर्मिती दुषित पाण्यात होते. पात्रात प्रक्रिया न करता सांडपाणी जात असल्याने फोफावणाऱ्या पाणवेलींवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पात्राच्या स्वच्छतेसाठी दरवर्षीचा शिरस्ता कायम राखला गेला. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सुचनेनुसार गोदापात्र स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली. गोदावरी संवर्धन कक्षाचे प्रमुख डॉ. विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅश स्किमर यंत्राद्वारे गोदा पात्रातील पाणवेली हटविल्या जात आहेत. सध्या चांदशी शिवारात हे काम सुरु आहे. आनंदवल्लीपर्यंत नदी पात्रातील संपूर्ण पाणवेली काढण्याचे काम सुरु राहणार आहे.
आणखी वाचा- नाशिक: तृतीयपंथीयांना धाक दाखवून हप्ता वसुली, इगतपुरीत दोन गुन्हेगार ताब्यात
प्रारंभी होळकर पूल, घारपुरे घाट तसेच चोपडा लॉन्स परिसरात क्रॅश स्कीमर यंत्राने पाणवेली काढण्यात आल्या. स्मार्ट सिटीकडून होत असलेल्या या कामावर आता मनपाच्या गोदावरी संवर्धन कक्षाचे नियंत्रण राहणार आहे. गोदावरी नदी आणि तिचे पात्र नितळ, स्वच्छ राहण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासह सामाजिक संस्था, राष्ट्रीय छात्र सेना पथक यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविल्या जात आहेत. यापुढेही सातत्याने स्वच्छता मोहीम, जनजागृतीद्वारे गोदापात्र पात्र स्वच्छ ठेवण्याची दक्षता घेतली जाणार असल्याचे उपायुक्त डॉ. मुंढे यांनी म्हटले आहे.