नाशिक – जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात पक्षी निरीक्षणादरम्यान जांभळा सूर्यपक्षी या प्रजातीतील अत्यंत दुर्मिळ वर्तनाची नोंद झाली आहे. पिलांची ‘विष्ठा थैली’ घरट्याबाहेर नेण्याच्या प्रक्रियेत पालक नसलेल्या तृतीय नर पक्ष्याचा सहभाग स्पष्टपणे दिसून आला. याची नोंद पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांनी केली आहे.
घरट्याच्या पालक नर पक्ष्याच्या पायाला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारे लावलेला रिंग टॅग असल्याने दोन नर पक्ष्यांमध्ये अचूक फरक करता आला. त्यामुळे संबंधित वर्तन करणारा पक्षी हा पालक नसून तिसराच असल्याचे निश्चित झाले. वर्तनशास्त्रीय दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण निरीक्षण असून पक्षीशास्त्रानुसार या लहान पक्ष्यांमध्ये पिलांची विष्टा पडद्यामध्ये बंदिस्त ‘विष्ठा पुटी’ स्वरूपात बाहेर पडते. घरट्याची स्वच्छता, शिकाऱ्यांपासून संरक्षण आणि रोगांचा प्रतिबंध यासाठी ही पुटी पालक पक्षी नर व मादी घरट्याबाहेर दूर नेतात. परंतु, या घटनेत तृतीय नर पक्षीच हे काम करताना दिसणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. काही वेळा पक्षी ही विष्ठा पुटी अन्न म्हणून वापरतात, त्यामुळे हा तिसरा पक्षी अन्नाच्या हेतूने आला असण्याची शक्यता देखील प्रा. बोरा यांनी व्यक्त केली. जांभळा सूर्यपक्षी हा भारतीय उपखंडात सर्वत्र आढळणारा लहान पक्षी आहे. या प्रजातीमध्ये पिलांची काळजी घेण्याची प्रक्रिया अत्यंत विकसित असून, ‘विष्ठा पुटी’ व्यवस्थापन हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे.
‘विष्ठा थैली’ म्हणजे काय ?
पिलांच्या आतड्यातील विशेष ग्रंथी एक आवरण (म्युकस) तयार करतात. विष्टा करताना ती पूर्णपणे या आवरणात बंदिस्त होते. पांढऱ्या गोळ्यासारखी दिसणारी ही थैली स्वच्छता व संरक्षणासाठी अत्यावश्यक असते. असे वर्तन सूर्यपक्ष्यांसह बुलबुल, चिमणी, शिंपी यांसारख्या पक्ष्यांमध्येही आढळते.
सामान्य वाटणारा पक्षी देखील निसर्गातील अनेक गूढ गोष्टी शिकवतो. आजपर्यंत सूर्यपक्ष्यांची अनेक घरटी आणि त्यांचे जीवनचक्र अभ्यासले, पण असे वर्तन प्रथमच पाहायला मिळाले. बीएनएचएसच्या रिंग टॅगमुळे तिसरा पक्षी ओळखणे शक्य झाले.हे निरीक्षण पक्ष्यांच्या वर्तनशास्त्रात अन्नस्रोताशी संबंधित वर्तन यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकते. पुढील संशोधनासाठी हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. – प्रा. आनंद बोरा (पक्षी अभ्यासक)
