कांदा हे सतत चर्चेत राहणारे पीक आहे. रोजच्या आहारातील मोठ्या वापरामुळे कांद्याला सतत मागणी असते. त्यानुसार कांद्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या उत्पादनाचे गणित फसले की, कांद्याच्या दरातील चढ आणि उताराच्या बातम्याही कानी येतात. यंदा राज्यात रब्बी हंगामात कांदा लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कांद्याच्या लागवडीपासून उत्पादनापर्यंतचे हे गणित…

राज्यात यंदा रब्बी हंगामात कांदा लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाल्याची आकडेवारी अलीकडेच समोर आली. पाऊसमान चांगले राहिल्याने ही वाढ स्वाभाविक मानली जाते. खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी अनेकांनी रब्बीत कांद्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार असली तरी बदलते हवामान आणि वाढता उत्पादन खर्चाचा प्रभाव त्यावर पडणार आहे.

राज्यात वर्षभरात खरीप, उशिराचा खरीप म्हणजे लेट खरीप आणि रब्बी या तीन हंगामात कांदा पीक घेतले जाते. कृषी विभागाच्या माहितीनुसार कांदा लागवडीखालील एकूण क्षेत्र १० लाख हेक्टरच्या आसपास आहे. यामध्ये रब्बी हंगामात सर्वाधिक साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड होते. खरीप आणि उशिराच्या खरिपाची लागवड तुलनेत बरीच कमी असते. रब्बीची लागवड नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत केली जाते. यंदा ही लागवड पूर्ण झालेली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत पाऊस राहिल्याने कांदा रोपांचे नुकसान झाले, ज्यामुळे अनेकांना एक-दोनवेळा बियाणे खरेदी करून पुनर्लागवडीची वेळ आल्याचे शेतकरी सांगतात. कांद्याचे बियाणे दोन प्रकारात उपलब्ध होते. एक जे शेतकरी स्वत: रोपांपासून तयार करतो. आणि दुसरे खासगी कंपन्यांचे बियाणे. यावेळी पावसात रोपे खराब झाल्याने दुबार पेरणीची वेळ आली. रोपे नैसर्गिक संकटात सापडल्याने बाजारातील खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचे प्रति किलो दोन हजार रुपये दर तीन हजारांवर गेले होते.

उन्हाळ कांद्याची नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांमध्ये लागवड झाली. सुरुवातीला कांदा रोपे तयार होण्यासाठी ४५ दिवस लागतात. ही रोपे लागवड केल्यानंतर रब्बी कांदा तयार होण्यास ११० ते १२० दिवसांचा कालावधी लागतो. त्याची प्रति एकरी १५ ते १८ मेट्रीक टन उत्पादकता आहे. खरीप आणि लेट खरीपच्या तुलनेत उन्हाळची उत्पादकता जास्त असते. त्यातही खरीप व उशिराचा खरीप कांद्याला फारसे आयुर्मान नसते. उन्हाळ कांद्याचे आयुर्मान अधिक असते. चांगला भाव येईपर्यंत तो चाळीत ठेवता येतो. त्यामुळे बाजारातील चढ-उताराचा विचार न करता उन्हाळ कांद्याला शेतकरी वर्गाकडून नेहमीच पसंती मिळते. पावसामुळे खरिपातील कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे दुष्काळग्रस्त भागात पाणी आहे. खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी येथील शेतकरी रब्बीच्या कांदा लागवडीकडे वळतील, हा कृषी विभागाचा अंदाज वाढलेल्या लागवडीशी मेळ साधणारा आहे.

शेतकऱ्याने स्वत: तयार केलेल्या बियाण्यांची उत्पादकता आणि खासगी कंपनीच्या बियाण्यांची उत्पादकता यात फरक पडतो. स्वत: तयार केेलल्या बियाण्यांची त्याला खात्री असते. कारण, आपल्या शेतात पिकलेल्या कांद्यातून दर्जेदार कांदा तो स्वत: बाजुला काढतो. नंतर वाफा पद्धतीने कमी क्षेत्रात लागवड करतो. उगवण होऊन फुल व नंतर गोंडे झाल्यावर काळ्या बिया तयार होतात. हेच बियाणे तो वापरतो. चांगल्या दर्जाच्या कांद्यापासून पारंपरिक पद्धतीने ते तयार केले जातात. ज्यांच्याकडे अशा प्रकारचे बियाणे नसते, त्यांना दुसऱ्या शेतकऱ्याकडून घेणे अथवा खासगी कंपनीच्या बियाण्यांशिवाय पर्याय नसतो. यावेळी शेतकऱ्याने तयार केलेल्या कांदा रोपांनाही पावसाचा फटका बसला. त्यामुळे अनेकांना खासगी कंपनीचे बियाणे वाढीव दराने खरेदी करावी लागली.

वाढता उत्पादन खर्च, हवामानाचा लहरीपणा आणि मजुरांची टंचाई हे आज कांदा शेतीसमोर मोठे आव्हान आहे. या शेतीचे समीकरण महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे मांडतात. एकत्रित कुटुंबात पूर्वी सहज उपलब्ध होणारे मनुष्यबळ विभक्त कुटुंबात दुरापास्त झाले. ग्रामीण भागातील तरुण मंडळी शिक्षण, नोकरीनिमित्त गावाबाहेर पडली. मजुरांवर शेतीची भिस्त असते. कांदा शेतीत लागवड, निंदणी, खुरपणी आणि शेवटी काढणीपर्यंत मजूर लागतात. यावर एकही ३५ ते ४० हजार रुपये खर्च होतो. एक एकर क्षेत्राला दोन किलो बियाणे लागतात. त्यावर यावेळी सहा हजार रुपये खर्च झाले, रब्बी कांद्याला किमान तीन वेळा रासायनिक खतांचा डोस दिला जातो, शेणखतही वापरले जाते. वातावरण खराब झाल्यास औषधाचा खर्च वाढतो. नांगरणीसाठी ट्रॅक्टर, ठिबक असेल तोही खर्च वाढतो. या सर्वाची गोळाबेरीज केल्यास एक एकर रब्बी कांद्यासाठी एक लाख रुपयांहून अधिक खर्च येत असल्याचे लक्षात येते. यावेळी लागवड अधिक असल्याने सारे काही सुरळीत पार पडले तर उत्पादनात वाढ होईल. एकरी १५ मेट्रीक टन उत्पादन झाले तरी आकारमानानुसार प्रतवारी होऊन दरही कमी-जास्त मिळतात, याचा दाखला दिला जातो.

वातावरणाचे परिणाम, उपाय

कांदा पिकात ढगाळ वातावरण आणि कमी सूर्यप्रकाश यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अन्न निर्मिती कमी होते. पिकाची वाढ नीट न झाल्यामुळे कांदा नीट पोसत नाही. पिकाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन रोगांना बळी पडतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होण्याचा संभव असतो. जास्त आर्द्रता आणि सरासरी कमाल तापमान २१ ते ३० अंश सेल्सिअस कांदा पिकावरील रोगांसाठी पोषक वातावरण ठरते. पर्पल ब्लॉच किंवा जांभळा करपा पानांवर सुरुवातीला पांढरे डाग पडतात. त्यामुळे अवेळी पान गळते. त्याचा परिणाम कांद्याच्या वाढीवर होतो. डाऊनी मिल्ड्यू आणि स्टेम फायलम ब्लाइट रोगांची वाढ होण्यासाठी असे वातावरण पोषक ठरते. त्यामुळे पाने पिवळी पडून वाळतात. कधीकधी पानांवर पांढरे डाग पडून पिळ पडतो. बदलत्या वातावरणात फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. यावर जमिनीतील पाण्याचा निचरा करावा. शिफारशीत कीडनाशकांची फवारणी करावी. फवारणीबरोबर चिकट द्रव वापरावे, जेणेकरून ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसामुळे फवारणी केलेले द्रावण धुवून जाणार नाही. उन्हाळी हंगामात फुलकिडे या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यासाठी उपाय योजना कराव्यात. जास्त तापमानामुळे कांद्याच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. पिकावर ताणाची परिस्थिती निर्माण होते. कांद्याची नीट वाढ होत नाही. कांदा पोसत नाही, बारीक राहतो. योग्य पाणी व्यवस्थापन करावे. ठिबक किंवा तुषार सिंचनामुळे फायदा होतो.

डॉ. भरत मालुंजकर
(वरिष्ठ संशोधन सहायक (कृषिविद्या) कृषी संशोधन केंद्र, निफाड)