नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात मध्यवस्तीत बनावट डीईएफ युरिया निर्मिती कारखाना उदध्वस्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथक आणि पोलीस विभागाने कारवाई केली. नवापूर तालुक्यातील धनलक्ष्मी पार्क परिसरात एका घरातून बनावट डीईएफ युरियाचा कारखाना सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने टाकण्यात आलेल्या छाप्यात कच्चा माल, तयार डीईएफ युरियाचा साठा आणि निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.

कारवाईदरम्यान टेक्निकल ग्रेड युरियाच्या ३६ गोण्या, विविध कंपन्यांच्या नावाने भरलेल्या २० लिटरच्या ३८ बादल्या, सुमारे १३ हजार लिटर तयार डीईएफ युरिया, पीव्हीसी टाक्या, फिल्टर, सिलिंडर आणि एक मालवाहू वाहन असा एकूण सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात राजस्थानमधील बाडमेर येथील गोवर्धनराम चौधरी, टिकमाराम चुनाराम आणि जसराम माचरा या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे समोर आले आहे. हे आरोपी नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादन बाजारात पुरवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या घटनेनंतर कृषी विभागाने राज्यभरात अशा प्रकारच्या बनावट खत आणि डीईएफ निर्मितीविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हे आरोपी नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादन बाजारात पुरवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या घटनेनंतर कृषी विभागाने राज्यभरात अशा प्रकारच्या बनावट खत आणि डीईएफ निर्मितीविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या बनावट डीईएफ युरियामुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो. विशेष म्हणजे यासाठी ग्रेड युरियाचा पुरवठा नेमका कुठून होत होता. आणखी साहित्य नेमके कोणाकडून येत होते. या तीघा सशयितांकडे नत्रखत बनविण्याचा परवाना असतांना कोणाच्या पाठबळाने ही राजस्थानी टोळी डीईएफ युरिया तयार करत होती, याबाबत पोलीस तपासात माहिती मिळण्याची शक्यता आहे. तसेच छाप्या दरम्यान काही नामांकित कंपन्यांच्या २० लीटरच्या डीईएफ युरियच्या बादल्या देखील आढळून आल्याने ही साखळी नामांकित कंपन्याच्या नावाखाली हा बनावट डीईएफ युरिया विक्री तर करत नव्हती ना, असा काहीसा संशय बळावत आहे. पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहे.