कोट्यवधीचा समृद्धी महामार्ग आणि मेट्रोच्या स्वप्नातून बाहेर पडून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कुपोषण आणि बालमृत्यूकडे लक्ष द्यावे, असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मी मुख्यमंत्री बोलतोय, असे सांगण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष कृती करावी, तसेच कथनी आणि करणीत एक वाक्यता आणावी, असा सल्ला विखे-पाटील यांनी फडणवीसांना दिला.

जिल्हा रूग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी शुक्रवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडून बालमृत्यू प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.  नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होवूनही मुख्यमंत्र्यांनी अद्याप नाशिकला भेट दिलेली नाही. हजारो कोटींचा समृद्धी महामार्ग आणि मेट्रो रेल्वेच्या स्वप्नातून बाहेर पडून त्यांनी कुपोषण आणि बालमृत्यूचे वास्तव ओळखले पाहीजे, असे ते यावेळी म्हणाले.

आरोग्य, महिला व बालकल्याण आणि आदिवासी विकास या तीन-तीन खात्याच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना त्यांना पाठीशी घालण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. नाशिकमधील बालमृत्यू हे सरकारचे सर्वात मोठे अपयश असून, थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ नाशिकमधील बालमृत्यूची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही विखे-पाटील यांनी केली.  भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करण्यामध्ये मुख्यमंत्र्याचा वेळ वाया जातो आहे. त्यामुळे मंत्री आणि सचिव देखील बेफिकीर झाले आहेत. आदिवासी विकास विभागातील रेनकोट खरेदीसह अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आपण बाहेर काढली. त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात आदिवासी विकासमंत्र्यांनी ती चौकशी उद्योग विभागाकडून करण्याचे जाहीर केले. उद्योग विभागातील भ्रष्टाचाराचे उद्योग समोर येत असताना ते या भ्रष्टाचाराची चौकशी कसे करतील, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.