नाशिक – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नवनियुक्त जिल्हाध्यक्षांशी येथील शिबिरात अडीच तास चर्चा करताना जपानी मार्शल आर्ट्स (जिऊ-जित्सू) खेळण्याचा आनंद घेतला. प्रात्यक्षिकांसह या क्रीडा प्रकाराची माहिती देऊन त्याचे महत्त्व अधोरेखित केले. जिऊ-जित्सूला जपानी अहिंसक युद्धकला मानली जाते. या खेळाच्या माध्यमातून स्वतःच्या शरीरावर व रागावर कसे नियंत्रण ठेवावे आणि अहिंसेच्या मार्गाने काम करावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.

राज्यातील ७८ नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे १० दिवसीय निवासी शिबिर प्रशिक्षणार्थींच्या शारीरिक प्रशिक्षणामुळे प्रकाशझोतात आले. शिबिरात दररोज सकाळी दीड ते दोन तास जपानी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याकरिता राहुल गांधी यांचे प्रशिक्षक अरुण हे दिल्लीहून खास शिबिरात आले होते. सभागृहात विस्तीर्ण मॅटची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावर प्रशिक्षणार्थींकडून जपानी मार्शल आर्ट्स या अहिंसक युद्धकलेचे प्रशिक्षण आणि शारीरिक कौशल्याचा सराव करून घेण्यात आला. शिबिराच्या समारोप सोहळ्यात राहुल गांधी जवळपास सहा तास होते. यातील निम्मा वेळ त्यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना दिला. जिऊ-जित्सूमध्ये आधीपासून पारंगत असणाऱ्या राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांसोबत मॅटवर बराच वेळ हा खेळ खेळण्याचा आनंद घेतला. अडीच तासांत चर्चा, मार्गदर्शन आणि एकत्रित खेळ, प्रात्यक्षिके असे सत्र पार पडल्याचे जिल्हाध्यक्षांनी सांगितले.

‘विरोधकांना खिलाडूवृत्तीने उत्तर द्या’

राहुल गांधी यांनी आयकिडो आणि जिऊ-जित्सू या मार्शल आर्ट्सना त्यांच्या दिनचर्येशी जोडलेले आहे. हा पारंपरिक जपानी, पकड-आधारित आत्मसंरक्षणाचा क्रीडा प्रकार आहे. यावेळी राहुल गांधी यांनी या खेळातून स्वतःच्या शरीरावर व रागावर कसे नियंत्रण ठेवावे आणि अहिंसेच्या मार्गाने कसे काम करत राहावे, यावर मार्गदर्शन केले. राजकारणात विरोधी पक्षाने कितीही टीका केली, चुकीचे वर्तन केले तरी हिंसेचा वापर न करता अहिंसा व खिलाडूवृत्तीने उत्तर द्यावे, असेही त्यांनी सूचित केले. अहिंसेचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी महात्मा गांधी यांची उदाहरणे आणि छायाचित्रे दाखवल्याची माहिती जिल्हाध्यक्षांकडून देण्यात आली.

आत्मसंरक्षणासोबत आत्मविकासावर भर

राहुल गांधी यांनी आयकिडो या जपानी युद्धकलेत ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. यामध्ये प्रतिस्पर्ध्याच्या स्वतःच्या गतीचा वापर करणे आणि अहिंसक मार्गाने संघर्ष सोडवणे यावर लक्ष केंद्रित केले जाते. तर जिऊ-जित्सू कलेत त्यांनी ब्लू बेल्ट मिळवला आहे. यामध्ये जमिनीवरील पकड, जोर आणि संतुलनावर भर दिला जातो. आयकिडो ही जपानी युद्धकला २० व्या शतकात मोरिहेई उएशिबा यांनी विकसित केली. आयकिडोचा अर्थ ‘ऊर्जेमध्ये सुसंवाद साधण्याचा मार्ग’ असा आहे आणि ती जिऊ-जित्सूची एक शाखा मानली जाते. जपानच्या नऊ अधिकृत युद्धकलांमध्ये आयकिडोला स्थान आहे. यातून आत्मसंरक्षण आणि आत्मविकासावर भर दिला जातो. यात पारंपरिक स्पर्धा नसतात; केवळ साधकांकडून प्रात्यक्षिके सादर केली जातात, जेणेकरून मनाला शरीराशी एकरूप होण्यास शिकवता येते, असे संदर्भ आढळतात.