नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तब्बल ३४ हजार कोटींची कामे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार न करताच हाती घेतली जात असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची सूचना केली. केंद्र सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणांमुळे देशाचे नुकसान होत असल्याची टीकाही गांधी यांनी केली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानांतर्गत निवडलेल्या राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवारी येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाने झाला. साडेपाच तासापेक्षा अधिक वेळ ते शिबीरस्थळी होते. यावेळी राज्यातील प्रमुख नेत्यांशी महत्वाच्या विषयांवर चर्चा, जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी संवाद, नंतर नवनियुक्त जिल्हाध्यक्षांशी चर्चा करीत राहुल यांनी काही काळ त्यांच्याबरोबर मॅटवर जिऊ-जित्सूला (मार्शल आर्ट्स) खेळण्याचा आनंद घेतला.
यावेळी गांधी यांनी‘जागतिक राजकारण आणि भारत’ या विषयावर मार्गदर्शन केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुंभमेळ्यात डीपीआर न करताच हाती घेतलेली कामे, प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग, शेतकरी आत्महत्या, एसआयआर प्रक्रिया आदी महाराष्ट्रातील अनेक प्रमुख विषय बैठकीत मांडले. यावेळी गांधी यांनी कुंभमेळ्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. कुंभमेळा कधी भरतो, त्याचे नियोजन कसे असते, इतक्या मोठ्या निधीतून काय केले जाते, याबद्दल विचारणा केली. डीपीआर न करताच ही कामे सुरू असतील तर त्याची आपल्या पातळीवर चौकशी करावी, असे त्यांनी सूचित केले. महाराष्ट्रात दर तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असल्याची माहितीही गांधी यांना देण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळातील पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
जीव गेला तरी संघाची विचारधारा अस्वीकार्ह
आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा कदापि स्वीकारू शकत नाही. उद्या त्यांनी आपले हात, पाय तोडले किंवा आपला जीव गेला तरी संघाच्या विचारधारेशी जोडू शकणार नाही, असे खा. राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करताना सांगितले. संघाच्या कार्यालयात कधीच जाणार नाही. प्रत्येकाने आयुष्यात एखादे चांगले ध्येय ठरवून मार्गक्रमणाची गरज त्यांनी व्यक्त केली. आपण घरात हिंसा करणार नाही. व्यसन करणार नाही अशी स्वत:साठी सीमारेषा आयुष्यात तयार करावी.
कोणाला आमदार, कोणाला खासदार व्हायचे आहे. प्रथम स्वत: मध्ये आत्मविश्वास निर्माण करा. लोकांचे प्रश्न ऐकून घ्या. ऐकण्याची सर्वात मोठी ताकद तुमच्यात निर्माण करा. नेत्यांच्या पुढे पुढे करणारा कार्यकर्ता जनतेला कधीही आवडणार नाही. जनतेच्या प्रश्नाशी एकरूप असलेला, जनतेला आपला वाटणारा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो जनतेचे ऐकून घेणारा व त्यांना आधार वाटणारा असला पाहिजे. यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी जिल्हाध्यक्षांना केले.
