नाशिक – काँग्रेसच्या राज्यातील ७८ नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या निवासी शिबिराच्या समारोपासाठी नाशिकमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. नारी शक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून तसेच हाताला काळ्या रिबिनी बांधून गांधी यांचा निषेध केला. ‘राहुल गांधी गो बॅक’, ‘गो बॅक’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. काहींनी ‘गो बॅक पप्पू’, अशाही घोषणा दिल्या. भाजपचे लोकप्रतिनिधी व महिला मोर्चाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे बुधवारी पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. संघटन सृजन अभियानांतर्गत निवडलेल्या राज्यातील काँग्रेसच्या ७८ नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे दहा दिवसीय निवासी शिबिर नाशिकलगतच्या गंगापूर धरण परिसरातील रिसॉर्टमध्ये सुरू आहे. या शिबिराचा समारोप गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक भाजपच्या वतीने काँग्रेसने नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, अमृता पवार यांच्यासह महिला पदाधिकारी व नगरसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थीही उपस्थित होते. काळे कपडे परिधान करून आणि हाताला काळ्या फिती बांधून काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राहुल गांधी हे नाशिकमध्ये गुप्त बैठकीसाठी आल्याचे नमूद केले. युवकांना एकत्र करून ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्याचे काम काँग्रेस व राहुल गांधी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नारी शक्ती वंदन विधेयकाला राहुल गांधी व काँग्रेसने विरोध केला म्हणून त्यांनी नाशिकमधून निघून जावे, अशी मागणी केदार यांनी केली.

भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा माजी मंत्री डॉ. भारती पवार यांनीही काँग्रेसच्या भूमिकेचा धिक्कार केला. नारी शक्ती वंदन विधेयकाला काँग्रेस व गांधी यांनी का विरोध केला, याबद्दल महिला व युवतींना प्रश्न असून त्यांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली. नाशिक ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमी आहे. राहुल गांधी यांनी वेळोवेळी त्यांचा अपमान केला असून, त्यामुळे गांधी यांनी नाशिकमधून निघून जावे, अशी मागणी डॉ. पवार यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले. काँग्रेसचे निवासी शिबिर शहरापासून साधारणतः १५ किलोमीटर अंतरावरील रिसॉर्टमध्ये कडेकोट बंदोबस्तात होत असताना भाजपने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात आंदोलन केले.