जळगाव: भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी डिजिटल सेवांचे एकत्रीकरण करत मोठे पाऊल उचलले असून ‘रेलवन’ हे सर्वसमावेशक डिजिटल व्यासपीठ अधिकृतपणे कार्यान्वित केले आहे. आरक्षित, अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटांच्या बुकिंगपासून ते पीएनआर स्थिती, लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग, तक्रार नोंदणी, रेल मदत सेवा आणि गाडीत भोजन बुकिंगपर्यंत सर्व सुविधा आता एकाच ॲपमध्ये उपलब्ध झाल्या आहेत.

रेल्वेच्या नवीन निर्णयामुळे विविध ॲप्सवर अवलंबून राहण्याची गरज संपुष्टात येणार असून प्रवाशांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा मिळणार आहेत. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केल्यानुसार, यापूर्वी अनारक्षित तिकीट बुकिंगसाठी वापरले जाणारे ‘यूटीएस ऑन मोबाइल ॲप’ एक मार्चपासून बंद करण्यात आले आहे. अनारक्षित तिकिटांची संपूर्ण सेवा ‘रेलवन’ ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. सध्या यूटीएस ॲप वापरणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी स्थलांतर प्रक्रिया सुलभ ठेवण्यात आली आहे. विद्यमान वापरकर्त्याला आयडी व पासवर्डच्या आधारेच ‘रेलवन’ ॲपमध्ये लॉगिन करता येणार असून, नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

तीन टक्के सवलत; डिजिटल व्यवहारांना चालना

‘रेलवन’ ॲपवर अनारक्षित तिकीट बुकिंगसाठी १४ जून २०२६ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर तीन टक्के सवलत देण्यात येणार आहे. रेल्वे ई-वॉलेटद्वारे तिकीट खरेदी केल्यासही सदरची सवलत लागू राहील. रेल्वेच्या प्रशासनाच्या मते, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि नव्या ॲपचा वापर वाढवणे, हा तीन टक्के सवलत देण्यामागील मुख्य उद्देश आहे. भविष्यात प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ही योजना कायम ठेवण्याचा किंवा विस्तार करण्याचा निर्णय घेतला जाईल.

सिझन तिकिटांसाठी ट्रान्सफर सुविधा

दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सिझन तिकिटे अत्यंत महत्त्वाची असतात. यूटीएस ॲपवर बुक केलेल्या सिझन तिकिटांसाठी शो तिकीट विभागात ट्रान्सफर तिकीट हा नवीन पर्याय देण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना त्यांचे वैध सिझन तिकीट थेट ‘रेलवन’ ॲपवर हस्तांतरित करता येईल. या प्रक्रियेमुळे कोणतीही आर्थिक हानी किंवा वैधतेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘सिंगल साइन-ऑन’ची विशेष सोय

‘रेलवन’ ॲपचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘सिंगल साइन-ऑन’ या अंतर्गत रेल कनेक्ट किंवा यूटीएस ऑन मोबाइलचा जुना वापरकर्ता आयडी वापरूनच थेट लॉगिन करता येते. त्यामुळे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्र आयडी-पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही.
ॲपमध्ये रेल मदत सेवा समाविष्ट करण्यात आल्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी, स्वच्छता, सुरक्षा, तिकीटविषयक प्रश्न किंवा अन्य तक्रारी थेट नोंदवता येणार आहेत. तक्रारींच्या निवारणाची स्थितीही ॲपवर पाहता येईल.

‘रेलवन’ ॲपमधील प्रमुख सुविधा

  • आरक्षित तिकीट बुकिंग
  • अनारक्षित (जनरल) तिकीट बुकिंग
  • प्लॅटफॉर्म तिकीट
  • पीएनआर स्थिती तपासणी
  • लाईव्ह ट्रेन रनिंग स्टेटस
  • सीट उपलब्धता व आरक्षण तपशील
  • तिकीट रद्द करणे व परतावा
  • रेल मदत सेवा
  • तक्रार नोंदणी व त्वरित निवारण
  • गाडीत ई-कॅटरिंगद्वारे भोजन बुकिंग
  • प्रवास नियोजन व मार्गदर्शन