धुळे : आदिवासीबहुल भागांच्या आर्थिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने नीमच–बांसवाडा–दाहोद–नंदुरबार या नव्या रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास मंजुरी दिली आहे. सुमारे ३८० किलोमीटर लांबीचा हा प्रस्तावित रेल्वे मार्ग राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक आदिवासी अंचलांना थेट जोडणार असून, दिल्ली–मुंबई दरम्यानचा एक नवा आणि तुलनेने कमी अंतराचा रेल्वे मार्ग उपलब्ध करून देणार आहे. आदिवासी भागाच्या दृष्टीने रेल्वे विभागाने उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिवाळीआधीच म्हणजे साधारणपणे सहा महिन्यापूर्वी या संदर्भात म्हटले होते की, आतापर्यंत रेल्वेपासून वंचित असलेल्या बांसवाडा जिल्ह्याची नैसर्गिक दळणवळण जोडणी दाहोदशी आहे. त्यामुळे डूंगरपूर–बांसवाडा–रतलाम या विद्यमान प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाच्या समांतर नीमच–बांसवाडा–दाहोद या मार्गाचाही डीपीआर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नवा मार्ग ताप्ती रेल्वे विभागामार्फत दाहोदच्या माध्यमातून मुंबई–दिल्ली मुख्य रेल्वे मार्गाशी जोडला जाणार असून, हा सर्वात लहान पर्यायी मार्ग ठरणार आहे. यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील किमान सहा शहरांना थेट लाभ होणार आहे.
खनिज संपदा, पर्यटन आणि रोजगाराला चालना पर्वतीय व आदिवासीबहुल असलेला बांसवाडा जिल्हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असला, तरी आतापर्यंत तो भारतीय रेल्वे जाळ्यापासून दूर राहिला आहे. या परिसरात मँगनीज, डोलोमाइट, चुनखडी, क्वार्टझाइट, तांबे आणि सोन्यासारखी खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. नव्या रेल्वे मार्गामुळे या खनिजांची वाहतूक कमी खर्चात आणि कमी वेळेत शक्य होणार असून, स्थानिक व्यापारालाही नवी गती मिळणार आहे. या योजनेत दाहोद–अलिराजपूर–नंदुरबार हा पर्वतीय व आदिवासी भागातून जाणारा मार्गही समाविष्ट करण्यात आला आहे. हा मार्ग ताप्ती विभागातून मुंबई–दिल्ली मुख्य रेल्वे मार्गाशी जोडणारा उच्च घनतेचा पर्यायी मार्ग ठरेल. तसेच, ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहादा शहरालाही या रेल्वे मार्गात समाविष्ट करण्याचा विचार करण्यात आला आहे.
पर्यटन आणि समावेशक विकासाला प्रोत्साहन या रेल्वे लाईनच्या उभारणीमुळे बांसवाडा, दाहोद आणि नीमच येथील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळेल. यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करणारी आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या भागांना देशाच्या इतर भागांशी जोडून समावेशक प्रगतीचा नवा मार्ग मोकळा होईल. ही रेल्वे लाईन केवळ भौगोलिक अंतर कमी करणार नाही, तर सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक विकासालाही नवी दिशा देणार आहे. परंतू या घोषणेनंतर मात्र संबंधित भागात रेल्वे विभागाकडून ठोस अशी कुठलीच हालचाल झालेली दिसत नाही.
दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) आणि परिसर हा उत्तर महाराष्ट्रातील भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. नीमच–बांसवाडा–दाहोद–नंदुरबार या प्रस्तावित आंतरराज्य रेल्वे मार्गाचा डीपीआर सध्या तयार होत असताना, दोंडाईचा–शिंदखेडा भाग या मार्गात समाविष्ट करणे विकासाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि दूरगामी परिणाम करणारे ठरू शकते. दोंडाईचा–शिंदखेडा हा भाग ताप्ती खोऱ्याच्या लगत असून, महाराष्ट्र–मध्य प्रदेश–गुजरात या तीन राज्यांच्या सीमावर्ती क्षेत्रात येतो. त्यामुळे हा भाग नैसर्गिकरित्या दळणवळणाच्या दृष्टीने केंद्रबिंदू ठरतो.
नकाशात नंदुरबारहुन रेल्वे मार्ग वेगळा होत आहे. दोंडाईचा वरून नाही असे स्पष्ट करून यासंदर्भात रेल्वे सूत्रांच्या म्हणण्यानुसार एकतर हा रेल्वे मार्ग नंदुरबार तळोदा मार्गे, नंदुरबार – शहादा मार्गे किंवा शिरपूर -शहादा – तोरणमाळ मार्गे करता येऊ शकतो. शिरपूरपर्यंत आणला तर मनमाड – इंदूर रेल्वे मार्गला जोडलाजाऊन या रेल्वे मार्गच्या माध्यमातून देशभरातील महत्वाची वाहतूक उपलब्ध होऊ शकेल. हा रेल्वे मार्ग विकसित झाल्यास मुंबई–दिल्ली मुख्य रेल्वे मार्गाला एक मजबूत पर्यायी कॉरिडॉर उपलब्ध होऊ शकतो.
